म्हाडा पाठोपाठ टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार
पुणे : आधी सैन्य भरती मग आरोग्य भारती आणि आता म्हाडाच्या परीक्षांपाठोपाठ शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले आहे. म्हाडाच्या पेपरफूटी प्रकरणी तपास करीत असताना ही बाब पुणे सायबर पोलीसांच्या समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण भरतीची प्रक्रियाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीईटी ही परीक्षा 21 नोव्हेंबरला घेण्यात आली होती.
जी ए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे टीईटी परीक्षा घेण्याची जबाबदारी होती. याच कंपनी मार्फत राज्यात जवळपास 20 परीक्षा घेतल्या जात होत्या. म्हाडाच्या पेपर फूटी प्रकरणी काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी . ए . टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुखला बेड्या ठोकल्या आहेत. म्हाडाच्या पेपर फूटी प्रकरणी प्रितेश देशमुख याच्या पिंपरी – चिंचवडमधील घरी तपास केला असता पुणे सायबर पोलिसांना देशमुखच्या घरातून राज्यातील शिक्षक भरतीसाठी राबवण्यात आलेल्या टीईटी परीक्षेची कागदपत्रं आणि काही विद्यार्थ्यांची ओळखपत्रं सापडली आहेत. त्यामुळे शिक्षण भरतीची प्रक्रियाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
