घसेटी पुलावरील मनपा शाळेत विविध अभ्यासक्रम
पुणे : महात्मा फुले पेठेतील घसेटी पुलावरील महापालिकेच्या दगडी शाळेत शैक्षणिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रांतील विविध अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिवसाई फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, ही शाळा अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. या परिसरात आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न असणारे, मागासवर्गीय आणि विडी कामगारांची संख्या मोठी आहे. या सर्व समाजघटकांना उद्योग, व्यवसायाचे प्रशिक्षण, समुपदेशन करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला.
रासने पुढे म्हणाले, पुणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने पंधरा वर्षांसाठी शिवसाई फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबविला जाईल. आस्थापना, प्रशिक्षक, शिक्षक आदी खर्च फाउंडेशनच्या वतीने केला जाईल. पाणी, विद्युत व्यवस्था आदी सुविधा महापालिकेतर्फे पुरविल्या जातील.
