पत्नी व मुलावर हल्ला करून वडिलांची आत्महत्या, कल्याणमधील खळबळजनक प्रकार
मुंबई : कल्याण येथील हायप्रोफाईल सोसायटीत एका व्यक्तीने आपली पत्नी व मुलांवर हल्ला करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद बनोरिया (वय 55) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना रात्री घडली असल्याचा पोलिसांचा अंदाज असून याप्रकरणी महात्मा फुले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, कल्याण पश्चिममध्ये चिकनघर परिसरात निखिल हाईट्स ही हाय प्रोफाइल सोसायटी आहे. या सोसायटीत बनोरिया कुटुंब चौथ्या मजल्यावर रहायला आहेत. प्रमोद बनोरिया हे सेवानिवृत्त मोटरमन आहेत. कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी पत्नी कुसुम आणि मुलगा लोकेश याला जखमी केले आणि नंतर स्वतःला संपवले, असे प्रमोद यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, लोकेश याने आज सकाळी सोसायटीच्या वॉचमनला फोन करुन अॅम्बुलन्स पाहिजे असे सांगितले. तेव्हा वॉचमने ही बाब सोसायटीतील इतर सदस्यांना सांगितली. सोसायटीतील लोकांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. सोसायटीवाल्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घरात प्रवेश केला एक तरुण जखमी अवस्थेत पडलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता एक महिलाही जखमी अवस्थेत दिसली तर दुसरीकडे एका इसमाचा मृतदेह पडलेला होता. घरात सर्वत्र रक्त पसरलेले होते.
