सिंहगड रस्त्यावरील नियोजित उड्डाणपुलासाठी निविदा मंजूर
पुणे : मोठा गाजावाजा करून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन केलेल्या सिंहगड रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यातच आता या रस्त्याला पर्याय ठरणारा मुठा कालव्यालगतचा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय उड्डाणपुलाचे काम सुरू करता येणार नसल्याचे संकेत अधिकार्यांकडून दिले जात आहेत. या नियोजित 118 कोटी 37 लाख 931 रुपयांच्या निविदेला आज स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यास किमान दोन महिने उशीर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) परिसरातील वडगाव, धायरी, नर्हे, खडकवासला गावांचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातून शहरात ये-जा करणार्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यातच सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राजाराम पुलापासून फनटाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे.
कामसाठी बॅरिकेड्स उभारल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन जोपर्यंत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही, तोपर्यंत कामास परवानगी न देण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. दरम्यान, पर्यायी कालव्यालगतच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यास काही अवधी लागणार असल्याचे दिसत आहे.
उड्डाणपुलाचे खांब बांधण्यापूर्वी माती परीक्षण करणार
”सिंहगड रस्त्यावरील नियोजित उड्डाणपुलाच्या संपूर्ण प्रकल्पात 1890 मीटर, 1260 मीटर आणि 250 मीटरचे तीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. या उड्डाणपुलासाठी एकूण 72 पिलर उभारले जाणार आहेत. मात्र, या प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक खांबाच्या भूगर्भाचे (माती) परीक्षण करावे लागणार आहे. हे काम करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कामासाठी भूगर्भ परीक्षण मशिनरी, बॅरिकेड्स आले आहेत. मात्र, यासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हे काम सुरू होऊ शकले नाही. ही परवानगी लवकर मिळेल, अशी आशा आहे.”
– अजय वायसे, उपअभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका
