बार्टी’मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे अभिवादन
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दादर (मुंबई) येथे चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
पुणे येथे बार्टीच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
बार्टी मुख्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बार्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ओमिक्राॕन च्या वाढत्या प्रभावामुळे शासनाने आखून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करून ऑनलाईन पद्धतीने ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत 21 व्या शतकातील भारतीय सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक चळवळ’ या विषयावर संविधानाचे अभ्यासक ज्येष्ठ विचारवंत प्रा. पी.आर.सोनवणे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करताना सांगितले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शोषित, वंचित, पीडित लोकांना न्याय, संविधानिक हक्क मिळवून दिले. बार्टीने महामानवाच्या विचाराचा प्रचार, प्रसार व संशोधन जोमाने सुरू ठेवावे.
राज्यातील समतादूतांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोवीड 19 च्या नियमाचे पालन करून महामानव विचार अभियानाद्वारे महामानवांच्या विचारांचा प्रचार, प्रसार केला.
बार्टी मुख्यालयातील प्रांगणात महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख उमेश सोनवणे, श्रीमती वॄषाली शिंदे, विधी सल्लागार शरद मडके, प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे आदींनी मनोगत व्यक्त करुन अभिवादन केले. याप्रसंगी बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
