डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार व कार्य कायमच सर्वांच्या लक्षात राहील – जयदेव गायकवाड
पुणे : आपल्या प्रखर बुद्धिमत्तेच्या पाठबळावर कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात बदल घडवणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, न्याय आणि स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. त्यांचे प्रेरणादायी विचार व कार्य कायमच सर्वांच्या लक्षात राहील,असे मत आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत माजी आमदार एड.जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालय येथे आयोजित महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निखिल गायकवाड उपस्थित होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.आर.नजन होते. यावेळी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून बुद्ध वंदना घेण्यात आली. एड. गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
स्वातंत्र्य पूर्वीच देशाच्या लोकशाहीच्या निर्मितीचा अभ्यास करणारा महान विचारवंत म्हणून जगात बाबासाहेबांची ओळख आहे. देशातील अर्थव्यवस्थेसह जातिव्यवस्थेचा अभ्यास करून त्यांनी लोकशाही संविधानाची निर्मिती केली. देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि अधिकार हि त्याची सर्वात मोठी देणगी आहे. भारतीय लोकशाही राज्यघटने सह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन कार्याचा सर्वांनीच अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौतम बनसोडे यांनी तर आभार प्रा. जगदीश गाणार यांनी मानले.
