अपंगत्व दिनानिमित्त क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये सूर्यदत्ता क्लोदिंग-फूड बँकेतर्फे रजई, सुकामेव्याचे वाटप
पुणे : जागतिक अपंगत्व दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित सूर्यदत्ता क्लोदिंग बँक आणि लायन्स क्लब पुणे यांच्या वतीने खडकी येथील क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये रजई, सुकामेव्याचे वाटप करण्यात आले. सैन्यात कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी ही संस्था आहे. त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी गेली १०१ वर्ष ही संस्था कार्यरत आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिहॅबलिटेशन ऑफ डिसेबल्ड सोल्जर्सचे अधिष्ठाता कर्नल (निवृत्त) वसंत बल्लेवार लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. चंद्रहास शेट्टी, लायन्स क्लब ट्वेन्टी फर्स्ट सेंच्युरीचे अध्यक्ष अभय गांधी, सचिव प्रीतम गांधी यांच्यासह लायन्स क्लब व सूर्यदत्ता संस्थेतील पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सुषमा चोरडिया यांनी आत्मीयतेने देशभक्तीपर गीत सादर केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “समाज आणि सूर्यदत्ता यांचे नाते वेगळे आहे. समाजातील विविध घटकांना जोडून घेत त्यांच्यासाठी शैक्षणिक आणि जीवनोपयोगी वस्तूंच्या, तसेच पुरस्काराच्या स्वरूपात प्रेरणा देण्याचे सामाजिक काम सूर्यदत्ता ग्रुप इन्स्टिट्यूट करीत आहे. या सामाजिक उपक्रमाअंतर्गत फूड बँक आणि क्लोदिंग बँक याद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. सूर्यदत्तामध्ये केजीपासून पीजीपर्यंत सर्व प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.”
“राष्ट्रभावनेने प्रेरित असलेले सैनिक देशाचे रक्षण करतात. हे करताना ते आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. देशाचे संरक्षण करताना वीरमरण आले किंवा अपंगत्व आले, तरी त्याचा ते स्वीकार करतात. अशाच सैन्यात कर्तव्य बजावलेल्या व युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या पत्नीसाठी व मुलांसाठी सूर्यदत्ता संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती व अन्य अनेक उपक्रम राबवले जातात. क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या कार्यात सहभागी होण्यास आवडेल. यांच्यासाठी आम्ही कौशल्याधारित अभ्यासक्रम राबवण्यास तयार आहोत. सैनिकांप्रती असलेला आदर, सन्मान व प्रेम भावनेतून आजच्या दिवशी सैनिकांसाठी रजई व सुकामेवा देत आहोत.”
