कीर्तन हे कथा रसाळपणे सांगण्याचे माध्यम – उस्ताद उस्मान खां
पुणे : कीर्तनामध्ये संगीताचा भाग मोठया प्रमाणात असतो. तसेच एखादी गोष्ट देखील उत्तमप्रकारे सांगितली जाते. पुण्यामध्ये पूर्वी अनेक ठिकाणी कीर्तन होत असे. आता याचे प्रमाण कमी असले, तरी देखील असे कीर्तन महोत्सव सुरु असणे आनंददायी आहे. कीर्तन हे कथा रसाळपणे सांगण्याचे उत्तम माध्यम आहे, असे मत संस्कार भारती पश्चिम प्रांताचे अध्यक्ष उस्ताद उस्मान खां यांनी व्यक्त केले.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद पुणे विभाग, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे आणि सेवा मित्र मंडळ, पुणे आयोजित प.पू. जगद््गुरु शंकराचार्य करवीरपीठ यांच्या शुभ आशीवार्दाने ह.भ.प. डॉ. किसन महाराज साखरे गौरवार्थ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुणे कीर्तन महोत्सव २०२१ चे आयोजन लालमहाल येथे करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी आयसीसीआर पुणेच्या डॉ.अनुजा चक्रवर्ती, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष जगदीश शेटे, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले होते. भारतीय स्वातंत्र्याचा पाया ख-या अर्थाने शिवरायांनी त्याकाळी लालमहालातून घातला. त्याठिकाणी कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आनंद होत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त क्रांतीकारकांवर आधारीत विशेष कीर्तने महोत्सवात होणार आहेत. ह.भ.प. मोहनबुवा कुबेर, ह.भ.प. हरिहरबुवा नातू, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांची कीर्तने दररोज सायंकाळी ६ वाजता होणार आहेत.
प्रा. संगीता मावळे म्हणाल्या, शहराच्या पूर्व भागात कीर्तनाचा प्रचार-प्रसार व्हावा, याकरीता १३ वर्षांपूर्वी पुणे कीर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला. भारताच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे होत असल्याने क्रांतीकारकांच्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहेत. तसेच यंदा महोत्सवांतर्गत देण्यात येणारा कीर्तन कोविद ह.भ.प. स्व. कमलाकरबुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार मोहनबुवा कुबेर यांना देण्यात येणार आहे. श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्या नृसिंह भारती (करवीर पीठ) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. तरी पुणेकरांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. होनराज मावळे याने आभार मानले.
