आयसरमध्ये इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिविटी सेंटरच्या उभारणीसाठी इंद्राणी बालन फाउंडेशनकडून २३ कोटी रुपयांची देणगी 

पुणे – विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासासाठी देशाच्या प्रयत्नांतील आपले योगदान म्हणून पुण्यातील इंद्राणी बालन फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च अर्थात आयसरमध्ये इंद्राणी बालन सायन्स ॲक्टिविटी सेंटरच्या उभारणीसाठी फाउंडेशनने सामंजस्य करार केला आहे.

आयसरचे संचालक प्रो. जयंत उदगावकर आणि इंद्राणी बालन फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त पुनीत बालन यांनी या सामंजस्य करारार स्वाक्षरी केली. आयसरची संकल्पना आणि स्थापनेपासून या प्रकल्पाचा भाग असलेले डॉ. अरविंद नातू यावेळी उपस्थित होते.

पदवीपूर्व शिक्षणामध्ये संशोधनाचा अंतर्भाव करणे तसेच बहुविद्याशाखीय प्रशिक्षण हे आयसरचे वैशिष्ट्य आहे. जागतिक स्तरावरील सर्वच अद्ययावत शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रशिक्षणाला मान्यता मिळाली आहे. येथिल तज्ज्ञ आणि विज्ञान तंत्रज्ञान प्रसाराने प्रेरित शिक्षक हे आयसरचे बलस्थान आहेत. शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी आणि शिक्षकांना आधुनिक विज्ञानाची गोडी लावण्याची गरज ओळखून आयसर त्याबाबत आता अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेत आहे. त्याचाच भाग म्हणून शिकवण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी शास्त्रज्ञांची व्याख्याने तसेच प्रात्यक्षिक अनुभव देण्याकडे आयसरचा कल आहे.

आयसरच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी पुनीत बालन हे पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये आपले योगदान देत आहेत. बालन फाउंडेशनच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या सभागृहात आतापर्यंत तब्बल दोन लाख विद्यार्थी आणि शिक्षकांनी विज्ञान विषयक प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके पार पाडली आहेत. नुकत्याच झालेल्या बालदिनानिमित्त सुमारे १३ हजार जणांनी या सुविधेचा लाभ घेतला. जिज्ञासा या विज्ञान प्रदर्शनात २२ हजारांहुन अधिक विद्यार्थी सहभागी झाले.

पुनीत बालन म्हणाले, बदलत्या काळातील समाजाच्या गरजांचा विचार करता आपल्या उपक्रमांच्या कक्षा विस्तारण्यासाठी इंद्राणी बालन फाउंडेशन प्रयत्नशील आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून येत्या तीन वर्षांमध्ये सुमारे ८० हजार चौरस फुटांचे अत्याधुनिक विज्ञान केंद्र उभारण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. ३५० आसन क्षमतेच्या वर्गखोलीचा यामध्ये समावेश असेल. विज्ञान उपक्रम केंद्र, प्रात्यक्षिक प्रयोगशाळा, ७२ आसनक्षमतेचा सेमिनार हॉल, १०० आसनक्षमतेचा परिक्षा कक्ष, भव्य ग्रंथालय, आणि अद्ययावत मिडिया सेंटर अशी या उपक्रमाची व्याप्ती आहे. विज्ञान तंत्रज्ञानाची वाट चोखाळू पाहणाऱ्या भविष्यातील तरुण पिढीसाठी हे केंद्र दिशादर्शक ठरावे असा बालन फाउंडेशनचा प्रयत्न आहे, असेही बालन यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

%d bloggers like this: