Monday, May 4, 2026
Latest NewsPUNE

बकेट – बेंचेस – पिशव्यांच्या खरेदी उधळपट्टीच्या विरोधात आपचे आंदोलन

पुणे : बकेट – बेंचेस – पिशव्यांच्या खरेदी उधळपट्टीच्या विरोधात आम आदमी पक्ष आक्रमक झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांना आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी लिहिलेल्या खुल्या पत्रानंतर आज पुणे महानगरपालिकेसमोर आम आदमी पक्षाने बकेट, बेंचेस, पिशव्यांच्या खरेदी उधळपट्टीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. सर्वसामान्य पुणेकर जनतेचा पैसा आणि जाहिरात नगरसेवकांची का ? याचा जाब यावेळी आम आदमी पक्षाने आयुक्त विक्रम कुमार यांना विचारला.

१६ कोटी रुपयांचा चुराडा हा केवळ आणि केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या जाहिरातीसाठी होत आहे. पुणेकरांच्या १६ कोटी रुपयांची उधळपट्टी थांबवा ! मनपातील दरोडे थांबले पाहिजेतच पण भुरटेगिरी सुद्धा थांबली पाहिजे अशी मागणी यावेळी आपचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी केली.

नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बाकडे, बादल्या आणि पिशव्यांच्या खरेदीवरील बंदी हटवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. यासाठी तब्बल १६ कोटी २० लाख रुपये पालिकेला मोजावे लागणार आहे. यापूर्वीही अशी खरेदी वादाच्या भोव-यात सापडली होती. अशा प्रकारची खरेदी आणि वाटप योग्य नाही. शिवाय शासन परिपत्रक क्र.एएमसी १४२००/२२६४/प्रक्र १४४/नवि – २४ दिनांक २६ फेब्रुवारी २००१ च्या परिशिष्ट ‘ब’ नुसार खाजगी संस्थांची / सहकारी संस्थांची तसेच वैयक्तिक लाभधारकांची कामे किंवा खाजगी सहकारी संस्थांना अनुदान अशा बाबींसाठी नगरसेवकांच्या स्थानिक विकास कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वात बसत नाहीत.

पुणे महापलिकेतील बाकडे, पिशव्या, बादल्या खरेदीचा इतिहास फारसा गौरवशाली नाही. अशी खरेदी हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. या वस्तूंची मूळ किंमत आणि महानगरपालिकेने खरेदी केलेली किंमत याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचे या अगोदर सप्रमाण सिद्ध झाले आहे. चढ्या दराने खरेदी केलेल्या या वस्तूंच्या वितरणाचा मात्र कोणताही हिशोब सादर केला जात नाही. ज्या लाभधारकांना या वस्तू दिल्या गेल्या त्यांची यादी, संपर्क नंबर तयार केली जात नाही. यासाठी लागणारा पैसा सामान्य पुणेकरांचा असला तरी तथाकथित ‘संकल्पना’ या सदराखाली प्रत्येक वस्तूवर जाहिरात मात्र नगरसेवकांची केली जाते. यापूर्वी पुणे महापालिकेतील स्थानिक विकास निधीतून खरेदी केलेल्या बादल्यांची विक्री चक्क अंदमानला विक्री होत असल्याची उघडकीस आले होते. काही आठवड्यांपूर्वी परिवर्तन संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये 2017 ते 2021 या चार वर्षांमध्ये नगरसेवकांकडून खूप मोठ्या प्रमाणावर कोट्यवधी रुपयांची बकेट, बेंचेस आणि पिशव्यांची खरेदी पालिकेच्या पैशातून केल्याचे समोर आले होते. त्यानंतर या प्रकारावर प्रचंड टीकादेखील झाली होती. तरीसुद्धा आता पुन्हा नव्याने बकेट, बेंचेस आणि पिशव्यांच्या खरेदीसाठी प्रत्येक नगरसेवकाला दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या आणि एकूण 16 कोटी रुपयांच्या खरेदीचा आम आदमी पक्षाने निषेध व्यक्त केला.

जनाधार संघटनेचे अध्यक्ष आणि नुकतेच आम आदमी पक्षात प्रवेश केलेले कृष्णा गायकवाड व सहकारी, सुजित अगरवाल, सुदर्शन जगदाळे, किरण कांबळे, रामभाऊ इंगळे, दत्तात्रय भांगे, सुशील बोबडे, अनिल धुमाळ, घनश्याम मारणे, विकास लोंढे, ताहेर इक्बाल, एस.एम. अली, सतीश यादव, ललिता गायकवाड, रोहन रोकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading