fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

बोगस दुबार व छायाचित्रे नसलेले मतदार वगळण्याची मागणी

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार व निवडणूक विभागाला निवेदन 


पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 29 व 31 मधील मतदार यादीत अनेक मतदारांची छायाचित्रे नसल्याचे आढळून आले आहे. परिणामी मतदार यादीत मतदारांचे छायाचित्र नसल्यामुळे बोगस मतदान मोठ्या प्रमाणात होऊ शकते. त्यामुळे या मतदारसंघातील ज्या मतदारांचे मतदार यादीत छायाचित्रासह नाव नसेल अशा मतदारांसाठी निवडणूक विभागाच्यावतीने आठ दिवसाचे मतदार छायाचित्र नोंदणी अभियान राबवून मतदारांना छायाचित्र अपडेट करण्याची मुदत देण्यात यावी; अन्यथा ज्या मतदारांचे यादीत नावासोबत छायाचित्र नसेल, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे.        

राजेंद्र जगताप यांनी निवडणूक विभाग व पालकमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आपणास मिळालेल्या माहितीनुसार 2014 च्या निवडणुकीत पिंपरी व भोसरी मतदारसंघाच्या तुलनेत चिंचवड विधानसभा मतदारसंघात काही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे बोगस मतदारांना अभय दिले गेले. तसेच निवडणूक विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी मतदार यादीतील बोगस मतदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे चिंचवड मतदारसंघात बोगस मतदान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे मतदानाचा आकडा वाढलेला दिसून आला आहे.          

राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की दुबार, बोगस व छायाचित्रे नसलेली वगळण्याच्या मोहिमेत पिंपरी विधानसभेतील 25 हजार मतदारांची नावे आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील 20 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली. मात्र, चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 27 हजार मतदार होते. एकाही दुबार, बोगस आणि छायाचित्र नसलेल्या मतदाराचे नाव वगळलेले दिसत नाही. त्यामुळे आता पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणीही राजेंद्र जगताप यांनी केली आहे.          

जर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीत मतदारांच्या नावापुढे संबंधित मतदाराचे छायाचित्र नसेल, तर आपण याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे राजेंद्र जगताप यांनी सांगितले. 


चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस, दुबार व छायाचित्रासह मतदार यादीत नाव नसलेले मतदार आहेत. तसेच हे मतदार वगळले पाहिजेत. गत विधानसभा निवडणुकीपूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील दुबार व छायाचित्रे नसलेल्या मतदारांची नावे वगळली असती, तर निवडणुकीनंतर चिंचवड विधानसभेत लक्ष्मण जगताप यांच्याऐवजी राहुल कलाटे आमदार असते. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून दुबार, बोगस व छायाचित्रे नसलेली नावे वगळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी कळकळीची विनंती आहे.         

–  राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, पिंपळे गुरव

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading