महात्मा फुलेंच्या स्मृती दिना निमित्त वाचन शिबीर
पुणे: सत्यशोधक समाजाची स्थापना करणाऱ्या, महाराष्ट्रात पुरोगामी विचार पेरणारे, महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, “शेतकऱ्याचा आसूड”कार, विचारवंत आणि समाजसुधारक, नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे असे महात्मा फुलेंच्या विविध पैलूंचे दर्शन वाचन शिबिरात जाणवले असे मत श्रद्धा रेखा राजेंद्र यांनी मांडले. महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त लोकायत संघटनेने वाचन शिबीर आयोजित केले होते.
महात्मा फुले यांच्या जीवन कार्य समजून घेण्यासाठी ३० हुन जास्त पुस्तक या शिबिरात ठेवण्यात आली होती. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते असे विचार आजच्या तरुणाई पर्यंत पोहोचत नाही. आजच्या व्हाट्सअप्पच्या जगात पुस्तकांना आपण जणू दूर लोटलं आहे. ज्यामुळे उथळ ज्ञानाचा खळखळाट होऊन माणसाची विवेकबुद्धी बोथट झालेली दिसत आहे. अशी खंत अक्षय इंद्रायणी अनिल यांनी मांडली. महात्मा फुलेंना अपेक्षित असलेला समाज घडवण्यासाठी आधीचा इतिहासातील समाज समजून घ्यावा लागेलं त्यामुळे एक दिवस का होईना फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त लोकायतच्या कार्यक्त्यांनी वाचन शिबीर आयोजन केले होते. या शिबिराच्या शेवटी सत्यशोधक ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले ग्रंथ तसेच त्यांवर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांचे वाचन करून चर्चा घेण्यात आली. तरुणाईचा या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
