Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

बांधकाम व्यवसायिकाकडे दीड कोटीच्या खंडणीची मागणी, पुण्यातील व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

पुणे : पिंपरी -चिंचवड मधील  बांधकाम व्यवसायिक अविनाश बारणे यांना दीड कोटीची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी पुण्यातील व्यापारी प्रितेश प्रकाश दुगड याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस ठाण्यात दुगड यांच्या विरोधातील हा गुन्हा दाखल झाला आहे.

समर्थ लँडमार्क्स या नावाने अविनाश बारणे बांधकाम व्यवसाय करतात. त्यांच्याबरोबर, महेश बारणे आणि निलेश बारणे हे देखील या व्यवसायात भागीदार आहेत. बारणे यांचा थेरगाव येथे शांताई पार्क हा गृह प्रकल्प आहे. या प्रकल्पात दुगड यांनी दोन सदनिका खरेदी करण्याचा व्यवहार २०१३ मध्ये बारणे यांच्याशी ठरवला. त्यानुसार पिंपरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करारनामा करण्यात आला. करारानुसार जानेवारी २०१९ मध्ये सदनिकांचा ताबा दुगड यांना द्यायचा होता. त्यामुळे , दरम्यानच्या काळात बारणे यांनी संबंधित प्रकल्पावर बँकेचे कर्ज घेतले. मात्र , माझ्या सदनिकांवर तुम्ही कर्ज कसे काढले, असे म्हणत दुगड यांनी बारणे यांच्याकडे खंडणी मागण्यास सुरवात केली.

सुरवातीला बारणे यांनी दुगड यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर दुगड यांनी रेरा कडे तक्रार केली. रेरा मध्ये सदनिकांचा ताबा आणि दोन सदनिकांचे प्रत्येकी दहा लाख असे ,एकूण वीस लाख दुगड यांना देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार बारणे यांनी पंधरा लाख रुपये दुगड यांना चेकने दिले. उर्वरित पाच लाख रुपयांचा चेक न वटल्याने दुगड यांनी त्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. असे असतानाही, प्रकरण मिटवण्यासाठी दुगड वारंवार बारणे यांच्याकडे एक कोटी 50 लाख रुपयांची खंडणी मागत होते. कायदेशीर कटकटी नको. त्यात वेळ वाया जाऊ नये म्हणून, बारणे देखील दुगड यांच्याशी चर्चा करायला तयार झाले. मात्र, दुगड यांची अवाजवी मागणी आणि सततच्या त्रासाला कंटाळून बारणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बारणे यांच्या तक्रारीवरून प्रितेश प्रकाश दुगड याच्या विरोधात वाकड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

खंडणी मागितल्याची क्लिप हि…

बारणे यांच्याकडे दुगड यांनी खंडणी मागितल्याची ऑडिओ क्लिप आहे. तसेच, दुगड याच्याबरोबर प्रत्यक्ष झालेल्या चर्चेची क्लिप देखील बारणे यांच्याकडे आहे. त्यात , दुगड खंडणी मागत असल्याचे स्पष्ट होत आहे. असे बारणे यांनी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading