Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRA

रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा – एकनाथ शिंदे 

मुंबई : दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा अधिक घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील सर्व रुग्णालये, कोविड केंद्रे यांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन घेण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या. सर्व रुग्णालये तसेच कोविड उपचार केंद्रांमधील आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपकरणांची तपासणी करुन त्या कार्यरत करण्यासाठी सज्ज करून ठेवण्याचे निर्देशही नगरविकासमंत्र्यांनी आज दिले.

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-१९ चा नवा घातक व्हेरियंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे, ही समाधानाची बाब असली तरी यामुळे यंत्रणा जरा निर्धास्त झालेल्या दिसतात, सामान्य नागरिकांकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून आता आपल्याला गाफिल राहून चालणार नाही, कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांची रुग्णालये सज्ज ठेवा, सर्व रुग्णालयांच्या इमारतींचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट  तातडीने करुन घेण्याच्या सूचनाही यावेळी शिंदे यांनी दिल्या. सुदैवाने सध्या रुग्ण नसल्याने बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यंत्रणा बंद आहेत, रुग्णालयांमधील आयसीयू कक्ष, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर यंत्रे यांची तपासणी करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन घेण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शारीरिक अंतराची मर्यादा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याच्या दृष्टीने सर्व महानगरपालिका, नगरपालिकांनी जनजागृती करण्याच्या सूचना देऊन प्रसंगी क्लिन अप मार्शल सारखे उपक्रम राबवून महापालिका, नगरपालिका स्तरावर मास्कची सक्ती करण्याचे निर्देशही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई महानगरपालिकेने विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा करुन मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये जे प्रवासी विदेशातून आले आहेत, त्यांची यादी सर्व महानगरपालिकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना नगरविकासमंत्री शिंदे यांनी दिल्या. कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट सापडलेल्या १० देशांमधून आलेल्या प्रवाशांची माहिती सर्व महानगरपालिकांनी सहायक आयुक्तांच्या माध्यमातून घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अति जोखमीच्या देशातून गेल्या १४ दिवसांतून आलेल्या प्रवाशांची देखील यादी  विमानतळाकडून घेण्याच्याही सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading