मृदुला चौकसकर आणि रुचा मोरेच्या “अरंगेत्रम”ने प्रेक्षक मंत्रमुग्ध..

पुणे : समईच्या मंद उजेडात चमकणारी नटराजाची मूर्ती, मृदुंगमचा ताल आणि बासुरी आणि व्हायोलिनचे सूर, दाक्षिणात्य थाटातील गायन आणि त्याच्या तालावर मनोहारी विभ्रम करत लयीत, डौलदारपणे पदन्यास करणार्‍या त्या दोन नर्तिका आणि मंत्रमुग्ध होऊन पाहणारे प्रेक्षक.. हे दृश्य होते भरतनाट्यम नृत्यांगना मृदुला चौकसकर आणि रुचा मोरे हिच्या अरंगेत्रम सादरीकरण सोहळ्यातील. टिळक स्मारक मंदिर येथे हा नृत्याचा कार्यक्रम झाला.

गुरु सुचित्रा दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या आठव्या वर्षापासून भरतनाट्यमचे धडे घेणारी नृत्यांगना रुचा आणि मृदुला हिने अरंगेत्रम सादर केले. या कार्यक्रमात दोघींनी भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या विविध छटा सादर केल्या.

अरंगेत्रम सादर करणे हे प्रत्येक नृत्य शिकणाऱ्या शिष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. भरतनाट्यम  नृत्यशैलीतील एका विशिष्ट पातळीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच अरंगेत्रम् सादर करण्याची परवानगी असते. यामध्ये विविध प्रकारातील नृत्यरचना सलग सादर कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा दोन-चारच्या समुहात अरंगेत्रम् सादर करण्यावर भर दिला जातो. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.

कार्यक्रमात रुचा आणि मृदुला हिने गंभीरनतई रागावर आधारित श्री विघ्नम भजे पुष्पांजली, अलारपू सहित गणेशवंदना, पुरिया धनश्री रागावर आधारित जतीस्वरम, रागमलिका रागावर आधारित वर्णम, यमनकल्याणी रागावर आधारीत कृष्णाकृती, हिंदोलाम रागावर आधारित तीलाना रागावर आधारित मंगलम या प्रकाराचे सादरीकरण केले. ऊर्जाच्या नृत्यात ताल व सुर व पदलालित्याचा सुरेख संगम या वेळी पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेशस्तवन नंतर अभिनेते श्रीकांत मोहन यादव, भारती विद्यापिठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक डॉ. सारंगधर साठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी जुईली पटवर्धन उपस्थित होत्या. नृत्य प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल फॉर डान्सच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात मृदंगमची साथ पी आर चंद्रन, गायनाची साथ निथी नायर, रश्मी मोघे, बासुरीची साथ सुनिल अवचट, सिंथेसायजर केदार परांजपे, व्हायोलिनची साथ बाला सुब्रमन्यम यांनी दिली. वेशभूषा के. मोहन आणि लक्ष्मी मोहन, लाइट-साऊण्ड हर्षवर्धन केतकर, कार्ड डिजायनर शिबानी चौधरी, प्रात्याक्षिक इशा जोगळेकर आणि तन्मयी शितोळे, अ‍ॅड. मिनल जोशी यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन सौ. गायत्री चौकसकर यांनी केले

Leave a Reply

%d bloggers like this: