Monday, May 4, 2026
ENTERTAINMENTLatest News

आला रे आला ‘पांडू’ चा ट्रेलर आला; ‘या’ तारखेला येणार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

बुर्रूम.. बुर्ऱुम.. म्हणत बुलेटवर स्वार होऊन आलेल्या पांडूची आणि केळेवाल्या उषाची सध्या सर्वत्र जोरदार हवा आहे. ‘पांडू’ चित्रपटातील या जोडीने पहिल्या टिझर आणि गाण्यांमधूनच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. विनोदाच्या दुनियेतील हुकुमी एक्के असलेले भाऊ कदम आणि कुशल बद्रिके त्यांच्या जोडीला हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सोबतीला हेमांगी कवी, प्रवीण तरडे आणि प्राजक्ता माळी यांसारखे नावाजलेले कलाकार अशा स्टारकास्टने सजलेल्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘पांडू’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विजू माने यांचे आहे. येत्या ३ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
पांडू या चित्रपटाची कथा आहे दोन मित्रांची. पांडू आणि महादू हे कोल्हापूरचे लोककलावंत. वगनाट्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचं काम दोघेही करतायत. एक दिवस नशिबाची अशी काही संधी चालून येते की या दोघांनाही मुंबईत नोकरी मिळते तेही हवालदाराची. पांडू तसा साधाभोळा आणि अगदी भाबडा तर महादू हा त्याच्या अगदी विपरीत चतुर आणि चाणाक्ष, दुनियादारी समजणारा. मुंबईत आल्यावर पांडूंच्या आयुष्यात येते केळी विकण्याचा व्यवसाय करणारी डॅशिंग गर्ल उषा. आसपासच्या स्वार्थी आणि मतलबी दुनियेत पांडूसारखी भोळी आणि साधी माणसंही असतात या गोष्टीचं तिला कौतुकही वाटतं आणि याचमुळे ती पांडूच्या प्रेमातही पडते.
हा चित्रपट पूर्णतः विनोदी अंगाने जाणारा असून तो प्रेक्षकांना खळखळून हसवेल आणि त्यांचा ताण दूर करेल असा विश्वास झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी यांना वाटतो. अवधूत गुप्ते यांच्या संगिताने सजलेल्या पांडूची गाणी सर्वत्र लोकप्रिय झालेली आहेत, बुरुम बुरुम ने २० लाख व्ह्यूज तर केळेवाली गाण्याने अवघ्या २४ तासात १० लाख व्ह्यूज मिळवलेत. चित्रपटाचा हा ट्रेलरही पांडूबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करेल अशी आशा चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केली. येत्या ३ डिसेंबरला हा चित्रपट राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading