पिशव्या व बाकड्यांवर १६ कोटी खर्च करण्याचा ठराव आयुक्तांनी रद्द करावा, सजग नागरिक मंचची मागणी

पुणे : महापालिकेच्या (PMC) सर्वसाधारण सभेत २२ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने एक मिनिटात पिशव्या व बाकडी या अनुत्पादक बाबींवर १६ कोटी रुपये खर्च करण्याचा ठराव संमत केला आहे.

गेले दीड वर्ष आपण यावर बंदी घातली होती. मात्र आता निवडणुकांच्या ( election)तोंडावर अशा प्रकारे प्रत्येक नगरसेवकाला १० लाख रुपयांचा निधी या अनावश्यक कामांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

आधीच मार्च २०१७ ते मार्च २०१९ या दोनच वर्षांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या खर्चाने साडेअकरा कोटी रुपयांच्या ज्यूट बॅगा त्यावर स्वतःचे नाव घालून शहरभर वाटल्या आहेत. तरीही शहरात बहुतांश पथारी वाले कॅरी बॅगा देतच आहेत.नागरीकांना परत नव्याने ज्यूट बॅगा हव्या असल्याचं स्वप्न कोणाला पडलं याचा शोध घेण्याची गरज आहे.

गेल्या वीस वर्षांत शहरांत हजारो बाकडी बसवण्यात आली , आज त्यांची काय अवस्था आहे , त्यातील किती‌ अस्तित्वात आहेत याचा लेखाजोखा घेतल्याशिवाय नवीन बाक बसवणे हा सामाजिक अपराध ठरेल.

तर पुणे महानगर पालिका आयुक्तांनी त्यांच्या विशेषाधिकारात हा ठराव रद्द करून नागरीकांचे करांचे पैसे वाचवावेत . हे शक्य नसेल तर किमान या पिशव्या व बाकड्यांवर नगरसेवकांचे नाव घालायला बंदी घालण्यात यावी अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर ( Vivek velankar) यांनी पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: