कुरूंदवाड येथे २२-२३ जानेवारी २०२२ दरम्यान पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन

पुणे :  विश्व मराठी परिषद आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबईने  २२ आणि २३ जानेवारी २०२२ दरम्यान पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन त्यांच्या जन्मगावी कुरूंदवाड येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सैनिकी शाळेच्या परिसरामध्ये केले आहे, अशी घोषणा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबईचे अध्यक्ष पं. विकास कशाळकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली.

यावेळी जागतिक किर्तीचे सितार वादक आणि द टेंपल ऑफ फाईन आर्टसचे डिन उस्ताद उस्मान खॉं, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे नातू वसंतराव पलुस्कर, विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले, प्रकाशक परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, ज्येष्ठ तबला वादक पांडुरंग मुखडे, शिक्षण प्रसारक मंडळी कुरूंदवाडचे चेअरमन प्रा. शरद पराडकर, कीर्तनकार आणि नाट्यसंगीत अभिनेता चारूदत्त आफळे, रघुनाथ नातू, प्रा. अनिकेत पाटील, प्रा. कल्याणी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

महोत्सवासाठी सर्व रसिक श्रोत्यांना नि:शुल्क प्रवेश आहे.  पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हे जाज्वल्य देशभक्त होते. त्यांनी “वंदे मातरम्”  आणि अनेक राष्ट्रीय गीतांना चाली लावल्या आहेत. राष्ट्रीय कॉँग्रेसच्या अधिवेशनाची सुरूवात त्यांच्या वंदे मातरम् गायनाने होत असे. म. गांधी, सरदार पटेल आदी कॉँग्रेस पुढाऱ्यांना आणि नेत्यांना त्यांच्याबद्दल कमालीचा आदर होता. “रघुपती राघव राजाराम… पतित पावन सीतराम” या प्रसिद्ध भजनालाही त्यांनी चाल लावलेली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात, संगीत क्षेत्रातील या युगपुरूषाला आणि महान देशभक्ताला अभिवादन करण्यासाठी विश्व मराठी परिषदेने कुरुंदवाड नगरीमध्ये २२ आणि २३ जानेवारी २०२२ रोजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने पं. विष्णू दिगंबर पलुस्कर संगीत महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाची संकल्पना पं. विकास कशाळकर यांची असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई ही संस्था या संगीत महोत्सवासाठी सहयोगी संस्था म्हणून सहभागी होत आहे. याचबरोबर संपूर्ण देशातील अनेक संगीत संस्था या महोत्सवासाठी सहकार्य करीत आहेत.

महोत्सवामध्ये जगप्रसिद्ध सितार वादक उस्ताद उस्मान खाँ, पं. विनायकराव तोरवी (बंगळुरू), पं. विकास कशाळकर असे अनेक मान्यवर कलाकार सहभागी होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूवर्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे नातू आणि पं. दत्तात्रय विष्णू पलुस्करांचे चिरंजिव श्री. वसंतराव पलुस्कर हे या महोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: