गेल्या 20 दिवसात 11 ते 20 वयोगटातील हजाराहून अधिक मुलांना करोनाची लागण
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत असताना; दुसरीकडे मात्र 11 ते 20 वयोगटातील एक हजाराहून अधिक मुलांना गेल्या 20 दिवसात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत काहीशी भर पडली आहे. पण मुलांमधील कोरोनाचे संक्रमण झाले असले तरी; या वयोगटामध्ये मृत्यूचे किंवा गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढले नसल्याने अधिक चिंता करण्याची गरज नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
गेल्या महिनाभरापासून शाळा सुरू झाल्या आहेत. यावेळी अनेक मुलं एकमेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे हे संक्रमण झाले असावे असा अंदाज आहे. दरम्यान, लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मुलांचे लसीकरण करण्याची लवकरात लवकर परवानगी मिळावी, यासाठी आपण आग्रही असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. जगभरामध्ये आता 11 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे. आपल्याकडे या वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु नाही. पण या वयोगटातील मुलांना जर कोरोनाची लागण झाली तर त्याचा प्रसार हा वृद्ध वयोगटातील व्यक्तींना होण्याची जास्त शक्यता आहे. या मुलांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार रोखण्यासाठी हे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी राज्याने केंद्राकडे आग्रह धरला आहे.
