मंजुश्री पाटील, इकबीर कौर यांना ‘सूर्यदत्ता ग्लोबल गुरु नानक ग्रंथसाहिब पुरस्कार-२०२१’ प्रदान
पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने ५५२ वी गुरु नानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सामाजिक व शैक्षणिक कार्यात बहुमोल योगदान देणाऱ्या आत्मन अकॅडमीच्या संस्थापक संचालक मंजुश्री पाटील व बाबा फतेहसिंह स्कुलच्या संचालक प्राचार्या इकबीर कौर यांना ‘सूर्यदत्ता ग्लोबल गुरु नानक ग्रंथसाहिब पुरस्कार-२०२१’ प्रदान करण्यात आला.
यावेळी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, उपसंचालक सुखविंदर मुलतानी यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुखविंदर मुलतानी यांनी गुरु नानक यांची शिकवण आणि मूल्ये याविषयी माहिती दिली.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “गुरु नानक यांनी निष्काम सेवा भाव शिकवला. आपण प्रत्येकाने याच सेवाभावाने काम केले पाहिजे. गुरुग्रंथ साहिब यांच्या मूल्यांची जपणूक करायला हवी. गुरुनानक यांनी ईश्वर आपल्या अंतर्मनातच असतो. आपण त्याला बाहेर शोधायची गरज नसून, दया, क्षमा, शांती, प्रेम यातच तो दडलेला असतो. नानकांनी समाजाला दिलेल्या विचारांचा अंतर्भाव आपल्या जगण्यात केला, तर आयुष्य सुखकर, आनंदी होईल.”
मंजुश्री पाटील म्हणाल्या, “गुरु म्हणजे एक व्यक्ती नाही, तर ते तत्व आहे. हे तत्व जीवनात सदैव आपल्या पाठीशी असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला महत्त्वाचे स्थान आहे. सामाजिक मुल्यांची शिकवण ते देतात. आपल्या आतील माणसाची घडण ते करतात. त्यातूनच आपण आयुष्यात प्रमाणिकपणे कार्य करत राहतो आणि याच प्रमाणिक कार्याची दखल समाज घेतो.”
इकबीर कौर यांनी गुरबानीचे महत्व पटवून दिले. त्या म्हणाल्या, गुरबानी हा मनाला प्रकाशित करून आंतरिक आनंद देणारा अध्यात्मिक ज्ञानाचा स्रोत आहे. आपण प्रत्येकाने त्याचे वाचन करून त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. सदृढ वैचारिक प्रक्रियेसाठी मार्गदर्शक आहे. गुरु कोणत्याही इच्छे शिवाय निःस्वार्थ, उदार भावनेने आपल्याला घडवत असतो. आपण समाजाप्रती देणे लागतो, या भावनेतून सेवा करत योगदान दिले पाहिजे.
