आता स्तनांच्या कर्करोगाचे प्रारंभिक व अचूक निदान शक्य

पुणे : स्तनांच्या कर्करोगाचे प्रारंभिक व अचूक निदान करणारी रक्त चाचणी दातार कॅन्सर जेनेटिक्सद्वारे विकसित करण्यात आली आहे. भारतात विकसित या चाचणीला नुकताच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) महत्त्वपूर्ण प्रगती (ब्रेक थ्रू) असे अमिनाम (डेजिग्नेशन) प्राप्त झाले आहे. अशा प्रकारची ही पहिलीच रक्तचाचणी असून या चाचणीद्वारे आता ४० वयोमर्यादेच्या पुढील स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रारंभिक व अचूक निदान करणे शक्य होणार आहे.

प्रोप्रायटरी टेक्नॉलॉजीचा वापर करीत सदर चाचणीद्वारे स्तनांच्या कर्करोगाशी संबंधित पेशी व क्लस्टर्स हे अचूकपणे ओळखले जातात. क्लिनिकल ट्रायल्सच्या माहितीवरून या चाचणीद्वारे प्रारंभिक (स्टेज 0 / डीसीआयएस) व स्टेज १ च्या कर्करोगासंदर्भात ९९% अचूक माहिती मिळू शकते, हे समोर आले आहे. निरोगी व कर्करोगाच्या रूग्णांचा समावेश असलेल्या तब्बल २० हजारांहून अधिक महिलांवर ही चाचणी प्रमाणित करण्यात आली आहे. या चाचणीमुळे मॅमोग्राफीशी संबंधित कोणत्याही रेडिएशनचा संपर्क येत नाही.

भारतात १.७ लाखांहून अधिक महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग असल्याचे आढळून आले आहे, यातील बहुतांशी स्त्रियांना स्टेज ३ किंवा ४ ला कर्करोगाचे निदान झाल्याचे समोर आले. जर स्तनांच्या कर्करोगाचे प्रारंभिक स्थितीत निदान झाले तर तो बरे होण्याचे प्रमाण हे ९९ टक्के असते. त्यामुळे सदर रक्तचाचणी या निदानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

कर्करोगाची कोणतीही लक्षणे नसणा-या चाळीस वर्षांवरील महिलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच आपल्या सुविधेप्रमाणे घरून अथवा कार्यालयामधून ही रक्ततपासणी करून घेणे शक्य आहे. शिवाय प्रारंभिक स्तरावर निदान झाल्यास त्यांना कर्करोगापासून मुक्ती देखील मिळू शकते. भारतातील शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय चिकित्सकांनी आपल्या अथक परिश्रमांनी आपल्या देशाला जगभरातील कर्करोग संशोधनाच्या मंचावर नेऊन ठेवले असून पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे हे एक उदाहरण असल्याचे दातार जेनेटिक्सचे अध्यक्ष राजन दातार यांनी सांगितले.

सदर चाचणी सीई (CE)चिन्हांकित असून युरोपमध्ये ती आधीच उपलब्ध आहे. लवकरच वाजवी किंमतीमध्ये ‘ईझीचेक’ नावाने ती भारतात देखील उपलब्ध होऊ शकणार आहे. या संदर्भात संस्थेच्या वतीने प्रमुख हेल्थकेअर प्रोव्हायडर्स यांच्याशी चर्चा सुरू असल्याची दातार यांनी नमूद केले. दातार कॅन्सर जेनेटिक्सचे एक कार्यालय हे पुण्यात असून सदर रक्त चाचणीसंदर्भात संशोधन करणारा एक सदस्य हा पुण्याचा आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: