Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

कर्करोग उपचार शिबीरांच्या चळवळीत मुंबईपेक्षा पुणे मनपा अग्रेसर – चित्रा वाघ

पुणे : प्रत्येक महिला संपूर्ण परिवाराची काळजी घेतात. मात्र, स्वत:कडे त्यांचे दुर्लक्ष होते. रोजच्या धकाधकीमुळे अनेक महिलांना विविध आजार देखील होतात. कर्करोगासारखे आजार सध्या मोठया प्रमाणात येत आहेत. त्यामुळे सामाजिक संस्थांना सोबत घेऊन शहराच्या प्रत्येक भागात याविषयी जनजागृती व तपासणी शिबीरे व्हायला हवी. पुणे मनपाने सामाजिक संस्थेसोबत करार करुन तपासणी शिबीरे राबविली असून मुंबईमध्ये अजून हे दिसत नाही. त्यामुळे कर्करोग उपचार शिबीरांच्या चळवळीत मुंबईपेक्षा पुणे मनपा अग्रेसर असल्याचे मत भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केले.

भारतमाता महिला मंडळ ट्रस्टतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन पर्वती येथील भारतमाता अभ्यासिकेच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी पुण्याच्या माजी उपमहापौर व नगरसेविका सरस्वती शेंडगे, पुणे शहर भाजपा प्रभारी व नगरसेवक धीरज घाटे, पुणे शहर महिला अध्यक्ष अर्चना पाटील, युवती आघाडी सरचिटणीस निवेदिता एकबोटे, नगरसेविका स्मिता वस्ते, राणी भोसले, वर्षा साठे, रुपाली धाडवे, विनया बहुलीकर, आयोजिका प्रियांका शेंडगे शिंदे आदी उपस्थित होते. शिबीरात ११० महिलांची कर्करोगविषयी सर्व तपासणी करण्यात आली. भाजपा युवती आघाडीच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. आमदार माधुरी मिसाळ व मुक्ता टिळक यांनी मार्गदर्शन केले.

चित्रा वाघ म्हणाल्या, आता कर्करोग हा आपल्या घराच्या उंबरठयावर आला आहे. कर्करोगाला वयाची मर्यादा राहिलेली नाही. कोणत्याही वयात हा आजार होताना दिसतआहे. त्यामुळे योग्य वेळी याविषयीचे उपचार घ्यायला हवे. अनेकांकडे हे उपचार घेण्यासाठी आर्थिक पाठबळ नसते. त्यांच्यासाठी अशी शिबीरे व मनपाच्या योजना उपयुक्त आहेत.

प्रियांका शेंडगे शिंदे म्हणाल्या, एकत्रितपणे काम केले, तर समाज व राष्ट्रासाठी चांगले काम करता येते. भारतामाता महिला मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही काश्मीरमधील सैनिकांसाठी उपक्रम राबविले होते. आता महिला आरोग्याच्या दृष्टीने उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. महिला सक्षमीकरणासोबत महिलांचे आरोग्य सक्षम करण्याकरीता आम्ही पुढाकार घेतला. पुढील विनामूल्य शिबीर २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता योगी अरविंद सांस्कृतिक मंच हॉल, सहकारनगर भाग २ येथे होणार आहे. महिलांनी शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading