‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ बालनाट्याला 21 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रंगला कलाकार-तंत्रज्ञांचा स्नेहमेळा

पुणे : ‘ढब्बू ढोल रिमोट गोल’.. 21व्या शतकातील 21 वर्षे पूर्ण करणारे आणि शंभरीकडे वाटचाल सुरू असलेले एक धम्माल बालनाट्य.. अगदी पहिल्या प्रयोगापासून 90व्या प्रयोगात भूमिका केलेल्या कलाकार-तंत्रज्ञांची उपस्थिती, पण चर्चा मात्र प्रतिक-प्रेरणा जोडी बरोबर गोट्याने केलेली धमाल अन् मामाने केलेली कमाल याचीच! निमित्त होते ते या बालनाट्यातील कलाकार-तंत्रज्ञांच्या मेळाव्याचे.


बालनाट्य चळवळीतील आघाडीच्या नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे ‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ या बालनाट्याची निर्मिती करण्यात आली आहे. या बालनाट्याच्या निर्मितीला 21 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनौपचारिक गप्पा-गोष्टी, आठवणींना उजाळा आणि अनुभव कथन असे या मेळाव्याचे स्वरूप होते. बालनाट्याच्या लेखिका-दिग्दर्शिका विनिता पिंपळखरे, पहिल्या प्रयोगातील बालकलाकार प्रेरणा पारखी, आईची भूमिका करणार्‍या दिपाली निरगुडकर, बाबा आणि मामा ही व्यक्तिरेखा साकारणारे अनुक्रमे प्रकाश पारखी, अरुण पटवर्धन तसेच प्रतिक बेल्लद, केतकी चंद्रात्रेय, संगीतकार चैतन्य आडकर, दत्ता थिटे, पार्श्वगायिका पूजा पारखी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 91व्या प्रयोगात भूमिका करणारे बालकलाकार शर्व दाते, श्रीजय देशपांडे यांचा सहभाग होता. पहिल्या प्रयोगात प्रतिक पारखी यानेही भूमिका साकारली होती.


सुरुवातीला प्रकाश पारखी यांनी बालनाट्याच्या निर्मितीचा, महाराष्ट्राच्या विविध भागात झालेल्या प्रयोगांचा प्रवास कथन केला. 12 एप्रिल 2001ला भरत नाट्य मंदिरात पहिला प्रयोग आयोजित केला होता त्या प्रयोगाचे तिकिट होते केवळ दहा आणि पंधरा रुपये तर तिकिट विक्रीतून मिळाले होते 970 रुपये, ही पहिल्या प्रयोगातील आठवण त्यांनी सांगितली. या बालनाट्याचे प्रयोग पुण्यातील सर्व नाट्यगृहे, उद्याने, मंगलकार्यालयात देखील झाले असल्याचे पारखी यांनी आवर्जून सांगितले. पालकांमुळेच बालनाट्याची चळवळ अव्याहतपणे सुरू असल्याचे गौरवोद्गार पारखी यांनी काढले.
विनिता पिंपळखरे म्हणाल्या, कलाकारांचे स्वभाव माहिती होते त्यामुळे संहिता लिहिण्यात मजा आली. 21 वर्षांत अनेक कलाकार बदलले पण प्रकाश पारखी, दिपाली निरगुडकर आणि अरुण पटवर्धन हे कलाकार या बालनाट्याचे आधारस्तंभ आहेत. या बालनाट्याचा विषय काळाच्या पलिकडचा आहे, प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून बालनाट्यांची आजच्या काळातही किती आवश्यकता आहे हे प्रकर्षाने दिसून येते.

Leave a Reply

%d bloggers like this: