अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन एका कर्मचाऱ्याने केली महापालिकेची 99 लाख रुपयांची फसवणूक

पुणे:स्मशानभुमीतील वीजेची कामे पुर्ण केल्याचे भासवून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन एका कर्मचाऱ्याने महापालिकेची तब्बल 99 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत याप्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दाखल करून गुन्हा नोंदविण्यात आला.

याप्रकरणी योगेश चंद्रशेखर मोरे ( रा. गणेश पार्क, सिंहगड रोड ) असे गुन्हा दाखल झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी प्रल्हाद पवार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 फेब्रुवारी ते 21 ऑक्‍टोबर 2021 या कालावाधीत घडला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिलेल्या माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचा कर्मचारी असलेल्या मोरे याने बाणेर, नवी पेठ व कोथरूड महापालिकेच्या स्मशानभूमीतील विद्युत विभागाची काही कामे पुर्ण झाली असल्याचे भासविले. त्यानंतर त्याने 99 लाख 8 हजार रुपयांची बनावट बिले तयार केली. संबंधीत बिले खरी असल्याचे भासविण्यासाठी त्याने महापालिकेच्या सर्वसाधारण फॉर्म बिल तयार केले. त्यावर त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करुन शिक्के मारले. तसेच या बिलांचे परस्पर कार्यालयीन जावक करून ती बिले मंजुरीसाठी आरोग्य विभागाकडे पाठवली होती.मोरे याने बनावट बिले सादर करीत, ती मंजूर करून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: