Saturday, May 2, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

संसदेत कायदे रद्द केल्यावरच आंदोलन मागे – राकेश टिकैत

नवी दिल्ली – गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज मोठे यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेऊन घरी जाण्याचे आवाहनही केले. त्यामुळे अनेक महिने उन्हातान्हात, थंडी-पावसात दिवसरात्र आंदोलन करणारे शेतकरी आता सुखाने घरी परतणार असे सर्वांना वाटले होते, मात्र ही लढाई अद्याप संपल्याचे दिसत नाही. कारण या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलन सध्या मागे घेणार नाही, असे म्हटले आहे. ‘आम्ही त्या दिवसाची वाट पाहतोय, ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील’, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्याचबरोबर सरकारने एमएसपीसह शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना बळ देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केले होते. यावेळीही चर्चा करून हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचा खूप आभारी आहे. आमचे सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीने, समर्पण भावनेने हे कायदे आणले. मात्र इतक्या प्रयत्नांनंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचे महत्त्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेने आम्ही त्यांच्या गोष्टीदेखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदलदेखील केले. दोन वर्षांसाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काहीतरी कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजवू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत’, असे मोदींनी म्हटले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading