Indian Idol Marathi च्या ऑडिशनला बेला शेंडे निवडणार बेस्ट स्पर्धक

सध्या ‘इंडियन आयडल मराठी’ (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम चर्चेत आहे. आजवर सोनी मराठी वाहिनीने प्रेक्षकांना अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम दिले आहेत आणि इंडियन आयडल मराठी हा कार्यक्रम त्यातलाच एक. ‘अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रोडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करते आहे. पहिल्यांदाच मराठी भाषेत इंडियन आयडल सुरू होणार असून देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल आता महाराष्ट्रासाठी आवाज शोधणार, ही उत्सुकतेची बाब आहे.

या सुरांच्या प्रवासाला लिखाणाचीही साथ लाभणारे. लेखक वैभव जोशी या शो चं लिखाण करणार असून एक दमदार कलाकृती रसिकांना बघायला मिळेल, यात शंकाच नाही. वैभव जोशी यांचं लिखाण प्रेक्षकांच्या आवडीचं आहे . त्यांच्या लिखाणाने, कवितांनी, गाण्यांनी ते सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. इंडियन आयडल मराठीचं लिखाण ते करणार म्हटल्यावर कार्यक्रम दमदार होणारच. आयडलच्या ऑडिशनला अजय-अतुल यांच्यासोबत लोकप्रिय गायिका बेला शेंडे सुद्धा असणार आहे. इंडियन  आयडलसाठी बेस्ट स्पर्धक निवडण्यासाठी ती  तिचे मोलाचे सल्ले देणार आहे. बेलाने तिच्या गोड गळ्यामुळे मनोरंजनसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा विविध सृष्टीत आपल्या आवाजाची झलक तिने दाखवली आहे.

तर स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी अजित  परबही ऑडिशनला असणार आहे. गाणे कसे निवडायचे, आणि त्याचा सराव  कसा करावा ह्या सगळ्यात म्युझिशियनच्या मदतीने ते  स्पर्धकांना मदत करतील. या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रोडक्शन्स प्रा. लि. संस्था करत आहे.  उत्कृष्ट स्पर्धकांना, सुरेल आवाज, अनुभवी परिक्षक, दिग्गज मार्गदर्शक यांना एकत्रित घेऊन सुरू होणारा हा सुरांचा प्रवास २२ नोव्हेंबरपासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वा. सोनी मराठीवर रसिकांना बघायला मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: