विद्यार्थ्यांच्या आकलनवाढीसाठी अभिनव उपक्रम राबवविणार- महापौर मूरलीधर मोहोळ

पुणे:महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये 2017-18 पासून ई-लर्निंग उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली होती. करोनाच्या काळात याचा फायदा सुमारे 72,000 विद्यार्थ्यांना झाला. तथापि, गेले दीड वर्ष विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येऊ शकले नसल्यामुळे त्यांच्या आकलनक्षमतेवर प्रतिकूल परिणाम झाला असल्याची बाब लक्षात घेऊन अंकुर लेखन-वाचन, बालवाटिका, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, गणिताचा पाया पक्का करणे, पालकांचे उद्बोधन असे विविध उपक्रम महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येत आहेत.

करोनाकाळात ई-लर्निंगद्वारे शिक्षण अव्याहत सुरू ठेवलेल्या महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे करोनानंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या आकलनवाढीसाठी अभिनव उपक्रम राबवविले जात आहेत.या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा पाया पक्का होण्यास मदत होईल, असा विश्‍वास महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचा लेखन आणि वाचनाचा पाया पक्का व्हावा, यासाठी त्या इयत्तांना शिकविणाऱ्या शिक्षकांना भाषा, गणित व इंग्रजी या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘बालवाटिका’ प्रकल्पाअंतर्गत अप्रगत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना शिकविण्यात येत आहे.

महापालिकेच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे महापालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. करोनाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागले. पालकांचा रोजगार संपुष्टात येणे, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावणे, मानसिक अस्थिरता निर्माण होणे, अशा गोष्टी लक्षात घेऊन शिक्षण विभागाच्या वतीने सहयोगी शिक्षकांच्या मदतीने अशा पालकांचे उद्बोधन करणे, त्यांना मानसिकदृष्ट्या धीर देणे, असे उपक्रम महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

दरम्यान, ‘समग्र शिक्षण अभियाना’अंतर्गत पुणे शहरातील 10 लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. 550 दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार श्रवणयंत्र, व्हीलचेअर, प्रवासभत्ता, वाचनभत्ता दिला जातो. तसेच करोनाकाळात सहयोगी शिक्षक दल, शिक्षण उत्सव, स्वाध्याय पुस्तिका निर्मिती व मोफत वाटप असे उपक्रमही राबविण्यात आले असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.

करोनाकाळात विद्यार्थ्यांना ई-लर्निंग व्यवस्थेद्वारे ऑनलाइन शिक्षण दिले जात असतानाच 2020-21 या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी करोना योद्धा म्हणून महत्त्वाचे योगदान दिले आहे. करोना सर्वेक्षण करणे, करोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे, क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आरोग्य विभागाची विविध कामे इत्यादी कामांमध्ये शिक्षण विभागातील सुमारे 5,500 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

महापालिका शाळांत उपलब्ध होणारे शिक्षण विद्यार्थ्यांना सक्षम बनविणारे असावे, हे उद्दिष्ट ठेवत करोनाकाळातही सातत्याने प्रयत्न केले गेले. करोनानंतरच्या काळात विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेत वृद्धी व्हावी, यासाठी महापालिका अनेक उपक्रम राबवत आहे.अशी माहिती महापौर मूरलीधर मोहोळ यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: