विश्वासार्हतेच्या जोरावर शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ सहकार चळवळ सुरु – सहकार आयुक्त अनिल कवडे

पुणे : सहकाराची बलस्थाने जर नागरिकांसमोर आणली नाहीत, तर आपल्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो. सहकारी बँक ही जनतेला अतिशय जवळची वाटणारी व्यवस्था आहे. कारण सुलभता आणि आपलेपणा या व्यवस्थेतून दिसून येतो. लोकांमध्ये जितकी विश्वासार्हता वाढेल तितकी ही सहकार चळवळ भविष्यात वृद्धिंगत होईल. विश्वासार्हतेच्या जोरावर शंभर वषार्पेक्षा जास्त कालावधी पूर्ण केलेली ही चळवळ खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेता येईल, असे मत महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे सहकार सप्ताहांतर्गत पुणे जिल्हयातील ५० नागरी सहकारी बँकांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यातील सहकारातील बलस्थाने या याविषयावरील व्याख्यानांचा अनिल कवडे यांच्या आॅनलाईन व्याख्यानाने प्रारंभ झाला. असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, मानद सचिव संगिता कांकरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे यांनी संयोजन केले आहे.

अनिल कवडे म्हणाले, सहकारी बँकांनी आपल्यामधील क्षमतेचा विकास करून लोकांमध्ये विश्वास निर्माण करायला हवा. देशाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये, दरडोई उत्पन्न वाढविण्यामध्ये, उद्योग-व्यवसाय वाढीमध्ये सहकारी बँकांचे योगदान मोठे आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक मदत सहकारी बँकांकडून मिळाली, हा फार मोठा आधार आहे. सहकारी बँकांच्या विश्वस्तांना जनकल्याणाचे साधन मिळाले आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करून सहकार चळवळीमध्ये त्यांनी योगदान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, सहकारी बँकांमध्ये काळानुरूप बदल होणे गरजेचे आहे. ग्राहकाभिमुख सेवा देणे आणि त्या चांगल्या पद्धतीने चालवणे गरजेचे आहे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. चांगले विचार आणि काळानुरूप सहकार व्यवस्थेमध्ये बदल करून ती व्यवस्था चालवल्यामुळे सहकारी बँकांमधील वेग, अचूकता आणि पारदर्शकपणा वाढवता येईल. असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. सुभाष मोहिते म्हणाले, सहकारामध्ये काही काम होते की नाही असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे या सहकार सप्ताहातून सहकाराच्या चांगल्या बाजू जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. सहकाराची सकारात्मक बाजू व बलस्थाने सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व सहकारी बँका एकत्रित येऊन हा सहकार सप्ताह वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहेत. सप्ताहांतर्गत प्रत्येक नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीवर सहकाराचा ध्वज लावणे, सहकाराची बलस्थाने मांडणारा फलक प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर लावणे, सहकार दिनाच्या दिवशी एकूण ५० लाख खातेदारांना शुभेच्छा संदेश पाठविणे असे विविध कार्यक्रम पुणे जिल्हयातील ५० नागरी सहकारी बँकांमध्ये आयोजित करण्यात आले  आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: