महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाची शक्यता 

पुणे : दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या थायलंड किनाऱ्यावर शनिवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम दक्षिणेकडील राज्यासह महाराष्ट्रात ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, दक्षिण अंदमान समुद्रावर तयार झालेल्या या कमी दाबाच्या क्षेत्रातील तीव्रता १५ नोव्हेंबरनंतर वाढणार असून, १८ नोव्हेंबरच्या सुमारास ते आंध्र प्रदेश किनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तरेकडील थंड हवेचा जोर कमी झाला आहे. परिणामी राज्यातील बहुतांश ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ते १७ नोव्हेंबरपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पुढील चार दिवसांत पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: