एस.टी.च्या विलीनीकरणासाठी ‘जनशक्ती’ने घातला मंत्रालयासमोर गोंधळ

मुंबई : एकीकडे एस.टी.च्या विलीनीकरणासाठी आझाद मैदानावर विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला असतानाच दुसरीकडे आज सकाळी मंत्रालयाच्या समोर अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करून गोंधळ घातला. मंत्र्याला आझाद मैदानावर यायला यांना वेळ नाही, त्यामुळे आम्हीच इकडे आलो असल्याचे जनशक्ती च्या महिला प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे यांनी सांगितले. दरम्यान बराच वेळ पोलिसांशी झटापट झाल्यानंतर विनिता बर्फे यांच्यासह दोन महिला व रऊफ पटेल आणि बारराजे चव्हाण या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार गोपीचंद पडळकर त्यांनी तात्काळ मरिन ड्राइव्ह पोलिस चौकीत दाखल होऊन तळ ठोकला.

 

गेल्या अनेक दिवसापासून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या पाहता महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एस.टी.च्या विलीनीकरणाचा लढा महाराष्ट्रभर उभा केला आहे. या लढ्याला जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी पाठिंबा दर्शवित चार दिवसापासून आझाद मैदानावर तळ ठोकून बसले आहेत. आझाद मैदानावरील आंदोलनाकडे सरकार पक्षातील अद्याप एकही मंत्री चर्चा करण्यासाठी गेला नाही. त्यामुळे जनशक्ती संघटनेने मंत्रालयावर धडक मारण्याचा निर्णय घेतला.

त्याप्रमाणे ‘जनशक्ती’चे प्रमुख अतुल खूपसे पाटील, कल्याण गवळी व राणा वाघमारे हे पत्रकाराच्या वेशात मंत्रालयाच्या बाहेर आले. आंदोलन करणाऱ्या जनशक्तीच्या महिला प्रदेशाध्यक्षा विनिता बर्फे यांच्यासह दोन कार्यकर्त्या, महासचिव रउफ पटेल, जिल्हाप्रमुख बाबासाहेब चव्हाण हे गनिमीकाव्याने मंत्रालयासमोर पोहोचले. व अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून त्याठिकाणी पोलीस आले व त्यांनी पटेल आणि चव्हाण यांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: