सामाजिक भूमिका समजून घेण्यासाठी लहुजी वस्ताद चरित्र संशोधन समिती स्थापनेची गरज -नितीन पवार

पुणे : सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे आणि महात्मा जोतिराव फुलेंचा बरेच वर्षे आपापसात संवाद होता. सत्यशोधक समाजाच्या कार्यात वस्तादांचा महत्त्वाचा वाटा होता. पण लहुजींच्या सामाजिक भूमिकांबद्दल अजून म्हणावे तितके संशोधन झालेले नाही. त्यांची ही बाजू जनतेपुढे आणण्याची गरज आहे आणि त्यासाठी लहुजी वस्ताद चरित्र शोधन समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी केली.

ते महात्मा फुले पेठेतील लहुजी वस्ताद साळवे तालीमीतील अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन लोकायत नागरी समिती, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, दलित स्वयंसेवक संघ, अंगणवाडी कर्मचारी सभा, हमराज ग्रुप व इतर संघटनांनी केले होते. यावेळी लहुजींच्या पुतळ्याला अभिवादन करत ‘सत्यशोधक लहुजी वस्ताद‌ साळवेंचा विजय असो’, ‘लहुजींचा इतिहास सर्वांना सांगणार’ अशा घोषणा देत सांस्कृतिक गाणीसुध्दा सादर करण्यात आली. त्यानंतर तालीम ते फुले वाड्यापर्यंत रॅली काढण्यात आली.

फुलेवाड्यातील समारोपा दरम्यान लोकायत नागरी समितीच्या ॲड. मोनाली अपर्णा यांनी लहुजींच्या जातीव्यवस्थेविरोधातील आणि स्त्री शिक्षणाच्या बाजूची भूमिका नमूद केली. दलित स्वयंसेवक संघाच्या कलावतीताई यांनी लहुजी, म. जोतिबा फुले, सावित्रीबाई यांचे विचार वर्षभर जागवत ठेवण्याची गरज आहे, असे मत आपल्या समारोपीय भाषणात मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील फुसे यांनी केली. यामध्ये योगेश मंजुळा, इश्तियाक, रिजवान, साजिद, मानव आदी कार्यकर्ते सामील झाले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: