अमरावती बंद : ज्यांनी बंद पुकारला त्यांनीच दंगल घडवली – संजय राऊत
औरंगाबाद : त्रिपुरा येथे मुस्लिम समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज आमरावतीत भाजपने बंद पुकारला असून त्याला हिंसक वळण लागले आहे. भाजप जातीय दंगली, धार्मिक दंगलीशिवाय राजकारण करुच शकत नाही. ज्यांनी बंद पुकारला त्यांनीच दंगल घडवल्या असतील. जर भाजपच्या माध्यमातून दंगली घडवल्या जात असतील तर गृह मंत्रालय सक्षम आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप वर निशाणा साधला आहे.
आज सकाळी संजय राऊत प्रसार माध्यमायांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचे विरोधी पक्षाचे हे मोठे कारस्थान आहे. जर राज्यपाल राजवटीचा खेळ ते खेळत असतील तर आम्ही त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडू. मराठवाड्यात, औरंगाबादच्या काही भागात, अमरावतीत असे प्रकार झाले असून हे ठरवून झालेल आहे. या राज्यातील विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला धक्का लावू नये. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत, हे त्यांनी विसरता कामा नये.
दरम्यान, हिंसाचार प्रकरणात काल बंद पुकारलेल्या रजा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. मात्र इतकी मोठी हिंसा करण्याची रजा अकादमीची ताकद नाही, त्यांच्याकडे इतके लोकच नाहीत. त्याच्यामागे वेगळेच लोक आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.
