एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन अमानवीय महाविकास आघाडी सरकारच्या निर्दयतेचा कळस –
चंद्रकांत पाटील

पुणे:राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्यदयतेचा कळस गाठला आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणं, हे अतिशय अमानवीय आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या सवलती मिळतात, त्या सवलती एसटी कर्मचाऱ्यांना मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, एसटी कर्मचारी न्याय्य हक्कासाठी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भाजपाची भूमिका आहे. आम्ही कोणत्याही श्रेयासाठी या आंदोलनाला साथ देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज हे रयतेचे राजे होते. कारण त्यांना जनतेच्या मनातलं कळायचं. पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्यदयतेचा कळस गाठला. आपल्या हक्कासाठी भांडणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करणं, हे अतिशय अमानवीय आहे.

ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आला. त्यावेळी आम्ही जे आदिवासींना जे लाभ मिळतात, ते धनगर समाज बांधवांना लागू केले. त्यानुसार राज्य सरकारने ज्या सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात. त्या सवलती एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचे जाहीर करुन, हा प्रश्न सोडविण्यास सुरुवात करावी.

मालेगावमध्ये सुरू असलेल्या प्रकारावर बोलताना श्री. पाटील म्हणाले की, जगभरात कुठेही काही घडलं, तर त्यावर देशात मूठभर लोकांकडून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, हे न कळणारे आहे. त्रिपुरातील घटनेवरुन काही मुठभर लोक मालेगावमधील देशभक्त मुस्लिम समाजबांधवांना बदनाम करण्याचं काम करत आहेत.‌

कंगना राणावतच्या वादग्रस्त ट्विटरवर प्रतिक्रिया देताना देशाच्या स्वातंत्र्याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देणं हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हडपसर जमीन प्रकरणी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचे स्वागत करताना श्री. पाटील म्हणाले की, “माझ्या खोट्या सही, शिक्का आणि महसूल नंबरचे आदेश काढून जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला. यानंतर मी स्वतः या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून, हे प्रकरण अतिशय गंभीर असून, याची सखोल चौकशीची मागणी केली होती. तसेच अशाप्रकारे खोट्या आदेशाद्वारे असे प्रकार झाल्या का? याचा शोध घेण्याची विनंती केली होती. कारण उद्या विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याही नावे असे बनावट आदेश काढून जमीन बळकावण्याचा प्रकार होऊ शकतो.”
हडपसर जमीन बळकाणाऱ्या प्रकरणात फौजदारी कारवाई झाली असून, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना अजून काही करण्याचे बाकी नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: