टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित 

नवी दिल्ली : टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष  वेणू श्रीनिवासन यांना आज राष्ट्रपती भवन येथे भारताचे माननीय राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ‘पद्म भूषण’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यापार व उद्योग क्षेत्रामध्ये  श्रीनिवासन यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना देशातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दक्षिण भारतात ग्राम विकासाचे अनोखे मॉडेल राबवून समाजाप्रती आपल्या वचनबद्धतेचे पालन करण्याबाबतची निष्ठा ही  वेणू श्रीनिवासन यांची ओळख बनली आहे.

वेणू श्रीनिवासन हे टीव्हीएस ग्रुपचे अध्यक्ष आहेत, या समूहामध्ये सुंदरम-क्लेटॉन आणि दुचाकी व तीनचाकी वाहनांची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनी यांचा समावेश आहे.  याआधी २०१० साली  श्रीनिवासन यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मानाचा ‘पद्म श्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. श्रीनिवासन हे ‘श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्ट’चे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत, हा ट्रस्ट त्यांनी १९९६ साली स्थापन केला होता.  ५००० हुन अधिक गावांमध्ये या ट्रस्टचे काम चालते आणि त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यक्षेत्रांमध्ये महिलांचे सबलीकरण व वनीकरण यांचा समावेश आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: