दिव्यांग सैनिकांच्या पोलादी मनगटांना नृत्यवंदनेतून सलाम   

पुणे : देशाच्या सिमेवर शस्त्र हातात घेऊन निधडया छातीने शत्रूंच्या गोळ्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या पोलादी मनगटांना नृत्यवंदनेतून सलाम करण्यात आला. सैनिकांशी रक्ताचे नाते नसलेल्या बहिणींनी चाकाच्या खुर्चीवर कायमचे बसून आयुष्याची दुसरी लढाई लढणा-या या भावांना प्रेमाने औक्षण करण्यासोबतच लाडूचा घास भरवित भाऊबीज साजरी केली.

निमित्त होते, विधायक पुणे व सैनिक मित्र परिवारातर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुर्नवसन केंद्रांतील सैनिकांसाठी आयोजित कलाकारांसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यांगना जयमाला इनामदार यांनी सैनिकांना औक्षण करुन त्यांच्याशी संवाद साधला. कर्नल बी.एल.भार्गव, पिंपरी चिंचवड सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीमंत शितोळे, संचालक बाबासाहेब साठे, संचालिका रंजना माने, पल्लवी देशमुख, आनंद सराफ उपस्थित होते. यावेळी सैनिकांनी बासरीवादन करुन उपस्थितांना थक्क केले. कार्यक्रमाचे संयोजन किरण पाटोळे, गिरीजा पोटफोडे, पल्लवी जाधव, कल्याणी सराफ,  पल्लवी देशमुख, रंजना माने यांनी केले.

जयमाला इनामदार म्हणाल्या, देशाच्या सिमेवर लढणा-या जवानांमुळेच आम्ही सुखाचे दोन घास खाऊ शकतो, याची आम्हाला जाण आहे. युवकांच्या मनात देशाविषयी आणि सैन्याविषयी आपुलकीची भावना जागृत करण्याकरीता प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे. समाजातील सर्व घटकांपेक्षा सैनिकांचे कार्य मोठे आहे. त्यांचा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यायला हवा.

श्रीमंत शितोळे म्हणाले, अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोेबल वाढते. अपंगत्व आले तरीही प्रत्येक सैनिकामधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. त्यामुळे त्यांच्यासोबत सण-उत्सव साजरे करण्याकरीता हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

अपंग सैनिक भोपालसिंग चौधरी म्हणाले, आज भाऊबीज साजरी करताना आमच्या कुटुंबियांसमवेत भाऊबीज साजरी केल्याचा आनंद मिळाला. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. अपंगत्व आले असले तरी आमचे मनोबल खचले नाही, असे त्यांनी सांगितले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: