‘प्रभातस्वर’मध्ये रंगले पं. उदय भवाळकर यांचे ध्रुपद गायन

पुणे : भारतीय राग संगीताची जननी मानल्या गेलेल्या ध्रुपद गायनाची स्वरानुभूती रसिकांनी आज घेतली. दीपोत्सवाची सांगता होत असतानाच ध्रुपद गायनाचा रसास्वाद घेणे हा रसिकांसाठी दुग्धशर्करा योग ठरला.
स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आयोजित ‘प्रभातस्वर’ या प्रभातकालीन रागांच्या मैफलीतील हे विशेष पुष्प आज विख्यात ध्रुपद गायक पंडित उदय भवाळकर यांनी गुंफले. पंडित भवाळकर यांचे घुमारदार-धीरगंभीर गायन आणि पखवाजवादनाची वैशिष्ट्यपूर्ण साथ यामुळे ‘ध्रुपद’ गायनाची ही प्रभातकालीन मैफल रसिकांच्या कायम स्मरणात राहील, हे नक्की!

आलाप, जोडझाला, बंदिश, उपज या क्रमाने ध्रुपद गायन सादर केले जाते. पंडित भवाळकर यांनी गायनाची सुरुवात राग कोमलरिषभ आसावरीने केली. जवळपास एक तास आलापी सादर करून ‘आयी खेलन को फाग लला सोऽहम् से छिपावत कहाँ’ ही बंदिश पेश केली. ‘आन सुनाई बांसुरी कान कान’ ही द्रुत लयीतील रचना रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. सादरीकरणाच्या उत्तरार्धात हिंडोल रागातील चौतालात बद्ध असलेली ‘नाद भेद अपरंपार’ ही रचना हृदयस्पर्शी ठरली. तर मैफलीची सांगता पंडित भवाळकर यांनी ‘ग्यान मदमाते जे नर निसदीन’ या भैरवीतील रचनेने केली.

अपवादानेच ऐकायला मिळालेल्या ध्रुपद गायकीचा स्वर्गीय आनंद घेताना पंडित भवाळकर यांच्या धीरगंभीर, भावपूर्ण सादरीकरणात एकरूप होत रसिकांनीही कलाकारांना मनापासून दाद दिली. जवळपास तीन तास रंगलेल्या ‘ध्रुपद’ गायकीच्या भावविश्वात रसिक समरस झाले. मेघना सरदार, तनुजा पांडे यांनी सहगायनासह तानपुरा साथ केली. तर वैशिष्ट्यपूर्ण ध्रुपद गायकीला सुखद मुंडे यांचे पखवाज वादन समर्पक आणि परिपूर्ण ठरले.
ध्रुपद गायकीत स्वरांचे गांभीर्य समजणे महत्त्वाचे
ध्रुपद गायनाविषयी रसिकांशी संवाद साधताना पंडित उदय भवाळकर म्हणाले, ध्रुपद गायन टाळीसाठी नाही तर या गायकीत स्वरांचे गांभीर्य समजणे महत्त्वाचे आहे; स्वरांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे मार्गी संगीत आहे. ध्रुपद गायनाच्या मैफली अभावानेच ऐकायला मिळतात, या विषयी विवेचन करताना ते म्हणाले, ध्रुपद गायन करणार्‍या कलाकारांची, या गायकीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे मैफलीही क्वचित होतात. ध्रुपद गायकी ही मर्दानी गायकी आहे, असा अपप्रचार झाला, वास्तविक अशी परिस्थिती नाही. माझ्याकडे ध्रुपद गायकीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींची संख्याच जास्त आहे, असेही त्यांनी गौरवाने सांगितले.
‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ अशी ध्रुपद गायन आणि पखवाज वादन साथीची एकरूपता असल्याचे पखवाज वादक सुखद मुंडे यांनी विषद केले. पखवाज या वाद्याची उत्पत्ती हीच मुळी ध्रुपद गायकीला साथ करण्यासाठी झाली असल्याचे ते म्हणाले. कलाकारांशी मंजिरी धामणकर यांनी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर यांनी आभार मानले. कलाकारांचा सत्कार ज्येष्ठ कथक गुरू मनिषा साठे, आनंद अवधनी, स्वप्नगंधा घांगुर्डे यांच्या हस्ते झाला.

Leave a Reply

%d bloggers like this: