Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

कणखर मन असेल, तरच रणभूमीवर शत्रूला तोंड देणे शक्य – ज्येष्ठ वैज्ञानिक प्रदीप कुरुलकर यांचे मत

पुणे : सैनिकांना फक्त तुम लढो, असे म्हणून चालत नाही. त्यासाठी त्यांना अत्याधुनिक शस्त्रे, साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा देखील पुरवाव्या लागतात. कणखर मन असेल तरच रणभूमीवर शत्रूला तोंड देणे शक्य आहे. असे कणखर मन भारतीय सैनिकांकडे आहे. त्यामुळे पुढील दीड ते दोन वर्षात ४०० ड्रोन एअर अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था सरकार सैनिकांसाठी करत आहे, असे मत ज्येष्ठ वैज्ञानिक प्रदीप कुरुलकर यांनी व्यक्त केले.

सैनिक मित्र परिवार व सहयोगी संस्थांतर्फे देशासाठी प्राणांची आहुती देणा-या शहीद व बेपत्ता सैनिकांच्या वीरपत्नींसमवेत सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.सुभाष मोहिते, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, विष्णू ठाकूर, अनिल पानसे, आनंद सराफ आदी उपस्थित होते.
तिरंगी उपरणे, मिठाई, दिवाळीच्या भेटवस्तू देऊन वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला. सन १९६२ च्या युद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. पुण्यातील गणेशोत्सव मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. जयश्री देशपांडे, योगिनी पाळंदे, गिरीश दंडवते, अनील पानसे, अथर्व ठाकूर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला.

प्रदीप कुरुलकर म्हणाले, सज्जनशक्तींचा दुर्जनशक्तींवर विजय झाला, यासाठी दिवाळी साजरी केली जाते. सैनिक देखील प्रचंड संघर्ष व जीवावर उदार होऊन देशासाठी सेवा करतात. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी सामान्यांनी कायम उभे रहायला हवे. प्रत्येक सैनिक हा माझा सैनिक आहे, ही भावना रुजायला हवी.

अ‍ॅड.सुभाष मोहिते म्हणाले, सैनिक रणांगणावर लढतात म्हणून आपण निर्भीडपणे येथे जगू शकतो. सैनिक अपंग झाला किंवा शहीद झाला, तर त्याचा मोठा आघात कुटुंबावर होतो. त्याची भरपाई करणे कोणालाही शक्य नसते. मात्र, आपण त्या कुटुंबाला आधार देण्याकरीता त्यांच्या पाठिशी उभे रहायला हवे.

आनंद सराफ म्हणाले, देशाच्या रक्षण करणा-या सैनिकांच्या वीरपत्नी त्यांच्या मागे प्रपंचाची दुसरी लढाई लढत आहेत. त्यामुळे सैनिक मित्र परिवारसह इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून आम्ही २००० सालापासून त्यांच्या सोबत आहोत, असेही त्यांनी सांगितले. गिरीष पोटफोडे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading