दिवाळी संध्येच्या निमित्ताने शिवसृष्टीत निनादले सनई-चौघड्याचे सूर

पुणेः-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आंबेगाव येथे उभ्या राहिलेल्या शिवसृष्टी सरकार वाड्यामध्ये दिवाळी संध्येच्या निमित्ताने सनई-चौघडा आणि तुतारीचे सूर निनादले. दिवाळी संध्येच्या निमित्ताने सरकार वाड्यावर पणत्या, रांगोळ्या, पायघड्या, सनई-चौघडा, तुतारी, गजरे, अत्तर, गुलाबपाणी या सरंजामासह स्वागत करण्यात आल्याने उपस्थितांनी पुन्हा एकदा शिवशाहीचा काळ आठवला आणि त्यात रममाण होत उपस्थित रसिक पुणेकरांनी ख-या अर्थाने रंगमंचावर शिवशाही दिवाळी साजरी केली.

मराठी रंगभूमी दिनाचे आैचित्य साधत नांदी, वासुदेव, पोवाडा, देवीचा गाॆधंळ, भारूड, गवळण, वाघ्या-मुरळी, पोतराज, लावणी, मर्दानी खेळ, असे लोकपरंपरा असणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिक त्यात प्रामुख्याने लाठी-काठी, दांडपट्टा, आदी साहसी युद्ध प्रकारांचा समावेश असलेल्या कार्यक्रमांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

यावेळी व्यासपीठावर संवाद पुणेचे सुनील महाजन, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर,विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे, कृष्णकुमार गोयल फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल,समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे,   संजय गांधी,  विलास चोरगे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची मूळ संकल्पना संवाद पुणेचे सुनील महाजन यांची होती. तर निर्मिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांची होती. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन योगेश शिरोळे यांनी केले होते.

या कार्यक्रमात रंगभूमी चित्रपट क्षेत्रात अभिनयाचा ठसा उमटविणा-या आशा काळे आणि ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडूरंग बलकवडे यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांच्या हस्ते
जीवनगाैरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलतांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे म्हणाल्या की, ‘स्वराज्य तोरण चढे मराठी पाऊल पडते पुढे’ ह्या गीतांच्या ओळी अभिनयाचा ठसा उमटविणा-या आशा काळे आणि ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांच्या माध्यमातून सिद्ध होतात. बलकवडे यांचे वर्णन करावयाचे झाल्यास ते इतिहासाचे अभ्यासू योद्धे आहेत. कोरोना काळात कलाकारांना खूप हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सरकार म्हणून जबाबदारी उचलत मदतीच्या भावनेतून नव्हे तर कृतज्ञतेच्या भावनेतून जी काही थोडी मदत विविध स्तरावर आम्हांला करता आली ती सेवा आम्ही केली. आगामी काळातही कलाकार, नाट्यगृह आदींशी संबंधित अडचणी तातडीने सोडविण्यावर आमचा कटाक्ष असेल.

यावेळी बोलतांना अभिनेत्री आशा काळे म्हणाल्या की, हा पुरस्कार माझ्या एकटीचा नसून पन्नास वर्षांहून अधिक काळ माझ्यावर प्रेम करणा-या रसिक माय-बापांचा आहे. माझ्या यशात कुटुंबाचा आणि त्यातही आईचा मोठा वाटा आहे. ‘वाहतो ही दुर्वांची जोडी’ या नाटकापासून मला पुणेकरांनी स्विकारले आणि पुणेकरांनी स्विकारल्यानंतर ओघाने उभ्या महाराष्ट्राने मला स्विकारले.

ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे म्हणाले, मराठ्यांचा इतिहास मी लिहू शकलो, त्याचा अभ्यास करुन व्याख्यानांच्या माध्यमातून मांडू शकलो, हे मी माझे भाग्य समजतो. शेवटच्या श्वासापर्यंत माझे हे कार्य सुरु राहील.

Leave a Reply

%d bloggers like this: