दुसऱ्याच्या मुलांचे बारसे करण्याची शिवसेनेला सवय – नारायण राणे

मुंबई : महाविकास आघाडीच्या बारामतीत वाजलेल्या फटाक्यामध्ये ना आवाज होता, ना धूर. त्याने फक्त प्रदूषण झाले, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘प्रहार’ केला.  तसेच दादरा नगर हवेलीमध्ये कलाबेन डेलकर या “बॅटर” या चिन्हावर निवडून आल्या आहेत. शिवसेनेचे तिथे निवङणूक चिन्ह देखील नव्हते. उद्या खासदार कलाबेन डेलकर या भाजपमध्ये आल्या तर बोंबलू नका, असा  टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. 

दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांचे निवडणूक चिन्ह “हातात बॅट घेतलेला बॅटर” हे होते. शिवसेनेचे धनुष्य बाण हे चिन्ह तिथे नव्हतेच. पण कलाबेन यांच्या विजयाचे श्रेय संजय राऊत घेत आहेत. राज्याबाहेर शिवसेनेचा खासदार निवडून आल्याचे म्हणत आहेत. पण त्यात अजिबात तथ्य नाही. उद्या खासदार कलाबेन जर भाजपमध्ये आल्या तर बोंबलू नका, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामतीत केलेल्या भाषणात सांगितले होते, की दिवाळीत फटाके फोडू नका. आवाज करू नका आणि धूर सोडू नका. असले बिनआवाजाचे आणि बिनधुराचे फटाके महाविकास आघाडीतच मिळतात. बारामतीतल्या त्यांच्या भाषणात आवाजही नव्हता आणि धूरही नव्हता. होते ते फक्त प्रदूषण, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना दिवाळीनंतर एकापाठोपाठ एक अटक होईल, असे राजकीय भाकीतही त्यांनी वर्तविले.

Leave a Reply

%d bloggers like this: