Saturday, May 2, 2026
ENTERTAINMENTLatest News

निर्माते दिपक राणे यांच्या आगामी सिनेमात दिसणार साऊथचे प्रसिद्ध कलाकार !

मराठी सिनेमात अनेक प्रयोगशील गोष्टी घडताना दिसत आहेत. असाच एक आगळा वेगळा प्रयोग निर्माते दिपक राणे त्यांच्या आगामी सिनेमात करणार आहेत. मुख्य म्हणजे या सिनेमात मराठीतील उत्कृष्ट कलाकार आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांचा संगम आपल्याला पाहायला मिळेल. शिवाय हा सिनेमा पॅन इंडिया प्रदर्शित होईल. सध्या सिनेसृष्टीत या आगामी सिनेमाची चर्चा होताना दिसत आहे.

दिपक राणे यांनी आजवर ‘मी नाही हो त्यातला’, ‘दुनियादारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’, ‘लकी’, ‘खारी बिस्कीट’ अश्या अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांची निर्मिती केली. तर ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘दुहेरी’, ‘फ्रेशर्स’, ‘अंजली’, ‘दुनियादारी फिल्मी स्टाईल’ अश्या प्रसिद्ध मालिकांच्या निर्मितीची धुरा त्यांनी सांभाळली.

सुत्रांच्या माहीतीनुसार, दिपक राणे निर्मित, या सिनेमात मराठी कलाकारांपैकी सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि केसरी फेम अभिनेता विराट मडके यांच्यासोबत अश्विनी चावरे व प्रसाद खांडेकर देखिल दिसणार आहेत. तर दाक्षिणात्य सिनेसृष्ट्रीतील लोकप्रिय ठरलेल्या ‘झिलका’ या कन्नड सिनेमातील मुख्य अभिनेता कविश शेट्टी आणि कन्नड मालिका विश्वातील ‘जोठे जोठेयाली’ फेम अभिनेत्री मेघा शेट्टी तसेच अर्जुन कापेकर, सुरेश या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन सदागरा राघवेंद्र करणार आहेत. शिवाय या आगामी सिनेमाचे शुटींग लवकरच सुरू होणार आहे.

निर्माते दिपक राणे त्यांच्या आगामी ‘पॅन इंडिया सिनेमा’विषयी सांगतात, “सध्या सिनेमे ग्लोबली प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे सिनेमांचा आवाका वाढवण्यासाठी आम्ही मराठी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांची निवड केली. आम्हाला आमचा सिनेमा पॅन इंडिया प्रदर्शित करायचा आहे. लवकरच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा आणि या सिनेमाचे शीर्षक सुद्धा जाहीर होईल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading