बुद्ध धम्माच्या आचरणा सोबतच स्वयम प्रकाशित होऊन प्रगती करणे आवश्यक – प्रज्ञा वाघमारे

पुणे : तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला अत्त दीप भव हा संदेश खऱ्या अर्थानं महत्त्वाचा असून बुद्ध धम्माच्या आचरणा सोबतच स्वयम प्रकाशित होऊन सर्वच क्षेत्रात प्रगती करणे आवश्यक आहे, असे मत त्रिशरण फाउंडेशनच्या संचालिका, बार्टीच्या माजी प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे यांनी व्यक्त केले.

महामंगल वर्षावास कार्यक्रमात “आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा” या तीन महिन्याच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन व अभ्यास केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ट्रस्ट, सिद्धार्थ मंडळ, रमामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या “महामंगल वर्षावास समाप्ती कार्यक्रमात” मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात बौद्ध धर्मगुरू भन्ते धम्मानंद यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर धम्मदेसना देऊन वर्षावासाचे महत्व या बद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोसायटी सांस्कृतिक भवन ट्रस्टचे सदस्य विलास कदम सिद्धार्थ मंडळाचे अध्यक्ष ऍड. नलिंद जाधव, रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीला कदम,वर्षावास ग्रंथवाचन समितीच्या अध्यक्षा निर्मलाताई डीखळे, बौद्धाचार्य प्रकाश नाईक शैलेंद्र कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमामाता महिला मंडळाच्या माजी सेक्रेटरी सुरेखा गायकवाड होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मंडळाचा अध्यक्ष सुशील कदम यांनी केले. माजी अध्यक्ष सरस्वतीबाई जगताप यांच्यासह निर्मला भालेराव, नंदा जाधव, सुनिता वाघमारे, रत्नप्रभा गायकवाड ,कांता धेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. सुमन बहुले यांनी वर्षावास कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली. विद्या गडकरी यांनी “माझ्या भीमाची पुण्याई” हे स्वागतगीत तर प्रकाश नाईक यांनी बुद्धगीत सादर केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमामाता महिला मंडळाच्या योगिनी भोसले ,शोभा सकपाळ, नंदा सरोदे, मीना सोनवणे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

%d bloggers like this: