Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

शिवनसेनेतर्फे किल्ला बनविण्याचे प्रशिक्षण 

पुणे  : दिवाळीचा सण जवळ येताच घरासमोर किल्ला बनविण्यासाठी चिमुकल्या शिलेदारांची लगबग सुरु झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौऱ्याची आणि त्यागाची दिवाळीतही आपल्याला आठवण राहावी, या उद्देशाने घरासमोर किल्लायांची प्रतिकृती बनवण्याची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. शिवाजी महाराजांचे बांधकाम विभागाचे प्रमुख हिरोजी इंदुलकर हे लहान मुलांना कळावे तसेच त्यांच्यात स्वराज्याची संकल्पना रुजावी या उद्देशाने शिवसेनेतर्फे पुण्यात चिमुकल्यांना किल्ला बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शिवसेनेतर्फे बाजीराव रोड येथील नातूबाग मैदानामध्ये भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास १०x १० चे तब्बल ३०हून अधिक मोठे किल्ले येथे स्पर्धकांद्वारे बनविण्यात येणार आहेत. याचे प्रदर्शन दिनांक १ नोव्हेंबर(सोमवार)पासून ते ७ नोव्हेंबर पर्यंत नातूबाग मैदान येथे नागिरकांना पाहता येणार आहे.

शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले की, गावागावातील चाळी,वाडे आणि हवेल्या सिमेंटच्या जंगलात बदलून माणुसकी कुंपणात बंदिस्त झाली असली तरी,बालगोपाळांकडून घरासमोर किल्ला बनविण्यासाठी चालू असलेल्या लगबगीने दिवाळीची चाहूल लागते. आधुनिकतेच्या जमान्यातही किल्ला बनविण्याची क्रेझ नव्या पिढीत वाढत आहे. दिवाळीचे किल्ले बनवताना वापरलेल्या विविध नवीन संकल्पना पाहून साहजिकच बालगोपाळांमधील धर्माभिमानी, अभ्यासू, चौकस,नाविन्यपूर्ण कलाकारी वृत्तीचे दर्शन होते. एकंदरीतच दिवाळीच्या धामधुमीच्या सर्वांच्या पसंतीस पडेल अशी किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात चिमुकल्यांतले आधुनिक हिरोजी इंदुलकर सध्या घरोघरी दृष्टीस पाडावेत यासाठी आम्ही किल्ला बनविण्याचे प्रशिक्षण लहान मुलांना दिले.

प्रशिक्षण कार्यशाळेवेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, मोरे, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, राहुल जेकटे, अनंत घरत, संदीप गायकवाड, अजय परदेशी, मुकुंद चव्हाण, प्रतीक आल्हाट, युवराज पारीख, प्रसाद चावरे, दीपक शेडे, नंदू येवले, नितीन रावळेकर,  गौरव सिन्नरकर, सुनीता खंडाळकर, भावना थोरात, सनी गवते, अक्षय फुलसुंदर, नीलेश जगताप, दिनेश  दाभोळकर, राजेश मांढरे, मोहन देशपांडे, निखिल जाधव उपस्थित होते. ललीत पवार यांनी तोरणा हा किल्ला साकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्रशिक्षक ललित पवार म्हणाले की, दगड, माती, विटा व्यवस्थित रचून डोंगर साकारले, हिरवळीसाठी डोंगरावर हाळीव टाकून डोंगरावर चिखलाचे पायऱ्या बुरुज आणि प्रवेशद्वार बांधून किल्ला साकारण्यात चिमुकले शिलेदार सध्या दंग झाले आहेत. डोंगर,किल्ला बांधून झाल्यावर काऊ-चुना आणि रांगरंगोटीद्वारे त्याला मूर्त स्वरूप दिले जाते. शेवटी भगवा ध्वज आणि सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज बालेकिल्ल्यावर विराजमान करुन प्रवेशद्वारापासून भालदार चोपदार,सनई चौघडेवाले, घोडेस्वार,सेनापती, मावळे दिमतीला हजर. अगदी तनमन धन लावून एकचित्ताने बनविलेला किल्ला सर्वांना दाखविण्यासाठी तयार. किल्ले बनवण्याची परंपरा कायम राहावी आणि बच्चेमंडळींना प्रोत्साहन देण्याहेतूने शिवसेनेकडून दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading