क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण : आर्यन खानला अखेर जामीन मंजूर
मुंबई : क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या किंगखान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्यन खान सोबत मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी निकालाची प्रत उद्या मिळणार असल्या कारणाने आर्यन खानला आजची रात्र देखील तुरुंगातच काढावी लागणार आहे.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने 2 ऑक्टोबरला छापा टाकून आर्यन खानला ताब्यात घेतले होते. त्यामुळे गेल्या 25 दिवसांपासून तो आर्थर रोडच्या तुरूंगात आहे. यादरम्यान तीन वेळा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून आतापर्यंत त्यासाठी तीन वकील बदलले आहेत. दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत आर्यन खानच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. एनसीबीने अधिकरांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही असा आरोप आर्यन खानच्या वकिलांनी केला होता. आर्यन हा शाहरूख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपास यंत्रणेने ताणून धरले असून तो सर्वसामान्य मुलगा असता तर हे प्रकरण एवढं वाढलच नसतं असही वकिलांनी कोर्टाला सांगितलं. आर्यन खानला या प्रकरणात पूर्णपणे गोवण्यात आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता.
