चितळे बंधू यांचा आता चटपटीत स्नॅक्स बनवणार
पुणे : ८२ वर्षांची समुद्ध परंपरा असलेल्या आणि आपल्या अवीट गोडीच्या पदार्थांसाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या चितळे बंधू यांनी बिंजबार™ सादर करत चटपटीत स्नॅक्स बार विभागात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले आहे. ब्रँडतर्फे पारंपरिक अस्सल भारतीय नमकीन पदार्थ आता बारच्या रुपात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. ग्राहकांना आता त्यांचे आवडीचे चटपटीत पदार्थ खाण्यासाठी अत्यंत सोयीस्कर अशा बार मध्ये मिळतील. या उत्पादनांच्या मालिकेत भेळ बार, लेमन भेळ बार आणि लाईट चिवडा बार यांचा समावेश आहे. या सादरीकरणातून केदार आणि इंद्रनील चितळे ही चितळे बंधू मिठाईवाले यांची पुढची पिढी २०० कोटीच्या मह्सुलापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन संपूर्णपणे नवीन अशा स्नॅक्स बार विभागात ब्रँड घेऊन येत आहे.
चितळे समुहाचे व्यवस्थापकीय भागीदार इंद्रनील चितळे म्हणाले, “चितळे बंधू मध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम स्नॅक्स (चटपटीत) पर्याय देण्यासाठी कटिबद्ध आहोत. अधिक चांगला उत्पादन विकास आणि नाविन्यपूर्णता यांच्या माध्यमातून ग्राहकांना पॅकेजिंगच्या त्रासाशिवाय पारंपरिक चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेता यावा असे आम्हांला वाटते. सध्या हे पदार्थ पिलो पाऊच मध्ये उपलब्ध आहेत. आजवर फारसे लक्ष न गेलेल्या या विभागात व्यवसायाचीही मोठी संधी आम्हांला दिसत आहे. ग्राहक बाहेर फिरताना, कोणत्याही ठिकाणी त्यांना आवडणारे पारंपरिक चटपटीत पदार्थ एकदम सोयीने खाऊ शकतील. ग्राहकांसाठी ही सोय उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.”
तोड नसलेली मिठाई आणि चटपटीत पदार्थ यांच्यासाठी चितळे बंधू हा ब्रँड ओळखला जातो. चवीची परंपरा अबाधित राखताना आणि त्याबाबत कोणतीही तडजोड न करता बिंजबार™ चे ध्येय भारतीय स्नॅक्सना सोप्या, सुटसुटीत, एकदम सोयीस्कर पद्धतीने बार च्या रुपात सादर करणे हे आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून कंपनीने या वैशिष्ट्यपूर्ण बारच्या प्रक्रियेसाठी उत्पादन केंद्राची स्थापना केली आहे. या बारची किंमत विचारपूर्वक १० रुपये ठेवली असून सुरुवातीला मुंबई आणि पुण्यामध्ये हे बार उपलब्ध होतील. कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त प्रिझरव्हेटीव्ह, रंग किंवा फ्लेवर्स या उत्पादनात असणार नाहीत. पारंपरिक भारतीय स्नॅक्स पदार्थांची मूळ चव यात राखण्यात येणार आहे.
