Thursday, April 23, 2026
Latest NewsPUNE

पत्रकार असल्याचे सांगून खंडणी मागणारे अटकेत

पुणे : पत्रकार असल्याचे सांगत अवैध गुटखा विक्रेत्याकडून अडीच लाखांची खंडणी घेणाऱ्या व अवैध गुटखा विक्री करणाऱ्या आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून एकूण ११,४८,७२८/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) विनोद अंबादास साळुंके (वय-४५, रा. कात्रज, पुणे) २) प्रवीण बाजीराव झेंडे (वय-२७, रा. आंबेगाव पठार, पुणे) ३) प्रमोद भानुदास घोणे (वय-२६, रा. धनकवडी, पुणे) ४) सोमनाथ यशवंत भडावळे (वय-३३, रा. धनकवडी, पुणे) ५) बबन अंबादास साळुंके (वय-४४, रा. फालेनगर, कात्रज, पुणे) ६) परमेश्वर अभिमान यमगर (वय-३५, रा. फालेनगर, कात्रज, पुणे) ७) अबू सहामा शेख (वय-३६, मार्केटयार्ड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अबू शेख याने विक्रीसाठी अवैध गुटख्याचा साठा करून ठेवल्याचे आरोपी झेंडे याला समजल्याने त्याने आपण पत्रकार असल्याचे सांगत अबू शेख याला गुटखा साठ्याची माहिती पोलिसांना न कळविण्यासाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी अडीच लाख रु. घेताना आरोपी पत्रकार झेंडे व त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच आरोपींना पोलिसांनी रंगेहात पकडले.

दि. २६ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना उरुळीदेवाची गावामध्ये बाजारमेळा या ठिकाणी अबू शेख याने अवैध गुटखा साठ केला आहे व त्याच्याकडे प्रवीण झेंडे नावाच्या पत्रकाराने ५ लाख रुपयांची खंडणी मागितली असून, खंडणीची रक्कम घेण्यासाठी झेंडे बाजारमेळा येथील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या आदेशाने पोलीस उप निरीक्षक निकेतन निंबाळकर यांनी हवालदारांच्या पथकासह त्याठिकाणी सापळा रचला. काही वेळाने एका क्रेटा गाडीतून वरील सहा आरोपी त्या ठिकाणी आले. अबू शेख हा पायी चालत त्या ठिकाणी आला व त्याने क्रेटा गाडीमधून आलेल्या आरोपींना रक्कम दिल्याचे पोलिसांना दिसले. त्यावेळी पोलिसांनी अचानक त्यांच्यावर छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागल्याने ते अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अडीच लाख रुपये व क्रेटा गाडी व अबू शेख याच्या गोडाऊनमधील ९७,७२८/- रु.चा हिरा कंपनीचा गुटखा असा एकूण ११,४८,७२८/- रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे.
वरील आरोपींविरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निकेतन निंबाळकर करीत आहेत.

ही कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ -५ च्या पोलीस उप आयुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहा. पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, पोलीस उप निरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार शंकर नेवसे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित टिळेकर, हेमंत कामथे, सत्यवान चव्हाण व दीपक सोनावणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading