Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

येत्या ३१ ऑक्टोबरला ‘स्वरपर्व’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : मागील दीड वर्षांपासून पुणे शहरातील रसिक सांस्कृतिक कार्यक्रमांची चातकासारखी वाट पाहत आहेत. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यावर राज्य सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील तालानुभूती फाउंडेशनतर्फे परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन आणि विलास जावडेकर यांच्या सहकार्याने ‘स्वरपर्व’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम येत्या रविवारी, दि. ३१ ऑक्टोबर, २०२१ रोजी संध्याकाळी ४.३० वाजता मयूर कॉलनी येथील बालशिक्षण शाळेच्या एमईएस सभागृहात संपन्न होईल. उदयोन्मुख आणि प्रतिथयश कलाकारांचा मिलाफ असणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका कार्यक्रम स्थळी दुपारी ४ वाजल्यापासून उपलब्ध होतील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर या प्रवेशिका दिल्या जातील.  राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिका यांनी घालून दिलेले कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन या वेळी करण्यात केले जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.

कार्यक्रमाची सुरुवात श्रुती मोदगी यांच्या गणेशवंदना सादरीकरणाने होईल. यानंतर संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांचे गायन होईल. त्यांना अभिषेक शिनकर (हार्मोनियम) आणि रामकृष्ण करंबेळकर (तबला) यांची साथ असेल. त्यानंतर पंडित शेखर बोरकर यांचे शिष्य अभिषेक बोरकर यांचे सरोद वादन होईल. त्यांना तबल्यावर चारुदत्त फडके हे साथ करतील. कार्यक्रमाची सांगता ग्वालियर घराण्याच्या जेष्ठ गायिका डॉ. वीणा सहत्रबुद्धे यांच्या शिष्या व प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने होईल. त्यांना पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य रोहित मुजुमदार हे तबलासाथ तर अभिनय रवंदे हे हार्मोनियमवर साथसंगत करतील.

प्रसिद्ध तबलावादक रोहित मुजुमदार यांनी काही वर्षांपूर्वी तालानुभूती फाउंडेशनची स्थापना केली असून सुधीर दर्भे हे फाउंडेशनचे सचिव आहेत. प्रतिथयश कलाकारांसोबत उदयोन्मुख कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे व रसिकांना एकाच वेळी दोन्ही कलाकारांची कला अनुभविता यावी या उद्देशाने ‘स्वरपर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

Leave a Reply