रशिया आणि पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि कॉबझनस थीएट्रीकल आर्टस इंस्टीट्यूट, मॉस्को, रशिया या संगीत आणि नृत्य विषयाचे शिक्षण देणाऱ्या जागतिक स्तरावरील दोन महत्वाच्या केंद्रांमध्ये आपापल्या कला आणि संस्कृतीचे आदानप्रदान करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे केंद्र संचालक प्रा. शारंगधर साठे, प्रा. प्रवीण कासलीकर, प्रा. देविका बोरठाकूर, मान्यवर गुरु डॉ. विकास कशाळकर, पं. मनीषा साठे, प. शमा भाटे, पं. सुचेता चापेकर, पं. नयन घोष, पं. रोणू मजुमदार तसेच अन्य गुरु मंडळी उपस्थित होती. तर कॉबझनस् थिएट्रीकल आर्टस् इंस्टीट्यूट, मॉस्को, रशिया तर्फे त्यांचे संचालक डॉ. दिमित्री टॉमीलीन, डॉ. कॅटरीना वा आणि इतर प्राध्यापक तसेच विद्यार्थीवर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमात रशियन सांस्कृतिक केंद्र मुंबईचे संचालक डॉ. सर्गे फॅन्देव यांचा विशेष सहभाग होता.
रशियामधील काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण यावेळी केले. त्याला प्रतिसाद म्हणून स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् मधील विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम आणि महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाला रशियन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी कौतुक केले.
शारंगधर साठे म्हणाले, दोन्ही केंद्रांनी भविष्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळण्यासाठी असेच एकत्र काम करण्याचे निश्चित केले आहे. या माध्यमातून पुण्यातील विद्यार्थी रशिया जाऊन तेथील कलेचे शिक्षण घेऊ शकतात तसेच रशियामधील विद्यार्थी देखील पुण्यात येऊन येथील लोककलेचे शिक्षण घेऊ शकतात.
