Tuesday, July 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

डेक्कन शुगर टेक्नोलॉजीस्टस् असोसीएशनचे ६६ वे वार्षिक अधिवेशन यंदा पुण्यात

पुणे : शेठ वालचंद हिराचंद यांनी १९३६ साली साखर उद्योगाशी संबंधित नवीन तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे व त्याचा फायदा सर्वांना व्हावा या उद्देशाने स्थापन केलेल्या द डेक्कन शुगर टेक्नोलॉजीस्टस् असोसीएशन चे ६६ वे वार्षिक अधिवेशन पुणे शहरात येत्या ३० ऑक्टोबर रोजी यशदा येथे संपन्न होणार आहे. केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यावेळी प्रमुख पाहुणे असतील, अशी माहिती आयोजन समितीचे प्रमुख सोहन शिरगावकर आणि असोसीएशनचे अध्यक्ष शहाजी भड यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी निवडक सभासद व निमंत्रित कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतील व इतर सर्व सभसदांना ऑनलाइन पद्धतीने परिषदेत सहभागी होतील असेही कळवीण्यात आले आहे.

सदर अधिवेशनाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे साखर कारखाने व संलग्न उद्योगशी संबंधित शोध निबंधांचे सादरीकरण. साखर उत्पादन व त्याचाशी संबंधित असलेल्या संस्थांकडून उत्पादन, शेती, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन आदी विषयांवर महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक या राज्यातील संस्थेच्या सभासदांकडून शोध निबंध मागवले जातात. त्यानंतर असोसीएशनच्या तज्ञ समितिकडून त्याची छाननी केली जाते आणि त्यातील उत्तम शोध निबंधांचे एकत्रीकरण असलेल्या पुस्तिकेचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले जाते.  यावेळी देखील ही परंपरा कायम राखली जाईल. नाविन्यपूर्ण आणि यशस्वी संकल्पनाचा लाभ सर्व सभासदांना व्हावा यादृष्टीने सदर पुस्तिकेची निर्मिती केली जाते. यंदाच्या पुस्तिकेत एकूण ४२ शोध निबंधांचा समावेश असेल.

अधिवेशनादरम्यान साखर उत्पादन क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करण्याऱ्या असोसीएशनच्या सभासदांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जातो. त्याबरोबरच साखर उद्योगात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती व संस्थाच्या योगदानाची दखल घेत त्यांना इंडसट्रीअल एक्सलंस पुरस्काराने गौरवले जाते. हे दोन्ही विभाग मिळून ११ पुरस्कार गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील.

याशिवाय गेल्या वार्षिक अधिवेशनातील शोध निबंध पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट १० शोध निबंधांना रोख बक्षिसे देण्यात येतील.  सर्वोत्कुष्ट शोध निबंधासाठी दिले जाणारे मंगल सिंग सुवर्ण पदक यंदा मुंबई साखर संघाचे माजी व्यवस्थापाकीय संचालक एम. एस. मराठे यांना दिले जाणार आहे. मराठे यांनी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय बाबींविषयी लिहिलेल्या शोध निबंधांसाठी सदर पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे . मराठे यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज ऑफ इंडियाचे व्यवस्थापाकीय संचालक म्हणून देखील काम पहिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading