ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्यांची दिवाळी काळी – हर्षवर्धन पाटील यांचा आरोप
पुणे : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबाच्या घरात ऐन दिवाळीत अंधार झाला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास संपूर्णपणे ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरला आहे, असा आरोप भाजपचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे, धर्मेंद्र खांडरे, प्रशांत अण्णा धोटे उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यातील 55 लाखा हेक्टर हून अधिक शेतजमीन पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याचे सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात 100 लाख हेक्टर हून अधिक जमिनीवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. कित्येक शेतजमिनी पुरामुळे नापीक झाल्या आहेत .
जमिनीचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्या पिकाची शाश्वती राहिलेली नाही. अन् ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे.
अतीवृष्टी नंतर राज्य सरकारने अनेक आश्वासने दिली. पण एकही घोषणा कृतीत आली नाही. अशा ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी माफी मागावी, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी केली.
गणेश भेगडे म्हणाले, शेतकाऱ्यांवरील हल्ल्याच्या लखिम पुर येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्या महा विकास आघडीला राज्यात अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या आणि नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी द्वेष का? संकटग्रस्त शेतकऱ्यांचा सहानुभूती दाखवणारा एक शब्दही मंत्रिमंडळाच्या बैठकीत का काढला जात नाही? असा सवालही गणेश भेगडे यांनी यावेळी उपस्थित केला.
