Wednesday, September 30, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील प्रियदर्शन सहस्रबुद्धे ठरले आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्रीन स्किल्स इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेचे विजेते

पुणे : संपुष्टात येत असलेले खनिज इंधन साठे, वाढत असलेले कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण आणि पर्यायाने हवामान बदलाचे होणारे परिणाम या भविष्यातील समस्यांच्या सोडवणुकीच्या दिशेने एक सकारात्मक व परिणामकारक पाऊल उचलत हरित अर्थव्यवस्थेसाठी काम करणा-या पुण्यातील प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्या ‘वायु’ उपक्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्या चक्राकार लाईफस्टाईल सोल्युशन्स या संस्थेच्या उर्जा संवर्धन व उर्जा स्वावलंबनाच्या क्षेत्रातील प्रयत्नांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘ग्रीन स्किल्स इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवला आहे. प्रियदर्शन यांनी आपले अभियांत्रिकीचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आयआयटी मुंबई येथून पूर्ण केले आहे.

अमेरिकेतील अशोका चेंजमेकर्स यांच्या वतीने आणि एचएसबीसी बँक यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेत जगभरातील एकूण १२ संकल्पांना विजेते ठरवण्यात आले आहे. स्पर्धेत जगभरातून विविध क्षेत्रामधील तब्बल ३४८ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल गेल्या आठवडयात अशोका चेंजमेकर्सच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला.

पर्यावरणासोबतच सामाजिक समस्यांचा विचार करीत त्यांवर नाविन्यपूर्ण व कौशल्यपूरक उपाय योजित काम करणा-या संस्थांची निवड या स्पर्धेत वेजेते म्हणून आली. पुढील संशोधन व विस्तारासाठी निधी (ग्रांट फंडिंग) असे या पुरस्काराचे स्वरूप असून या अंतर्गत २० हजार अमेरिकी डॉलर्स इतका निधी ‘वायु’ या उपक्रमासाठी देण्यात येणार आहे. याबरोबरच अशोका चेंजमेकर्स व एचएसबीसीच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही संस्थेला मिळू शकणार आहे.

वायु या उपकरणाबद्दल अधिक माहिती देताना प्रियदर्शन म्हणाले, “संपुष्टात येत असलेल्या खनिज इंधनांना पर्याय विकसित करून सामान्य माणसाच्या हातात उर्जानिर्मितीची ताकद द्यावी, या उद्देशाने वायु बायोगॅस तंत्रज्ञान उपकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. वायु हे एक बायोगॅस उपकरण आहे ज्यामध्ये प्रामुख्याने घरातील ओला कचरा (प्रामुख्याने उरलेले अन्न) जिरवित मिथेन वायू निर्माण केला जातो. तयार झालेला मिथेन वायू हा पाईपलाईनद्वारे स्टोव्हला जोडला जातो. विशेष म्हणजे यावर सर्व प्रकारचे अन्न शिजविणे शक्य आहे.”

या उपकरणाद्वारे आज दिवसाचा २.५ टन कचरा जिरवून वर्षाचे ३००० सिलिंडर इतका गॅस वाचतो आहे. शिवाय  त्यातून वर्षाचे १२५ टन जीवाश्म कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होण्यापासून देखील रोखला जात आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हरित अर्थव्यवस्था निर्माण करीत असताना ओला कचरा व्यवस्थापनाद्वारे स्वच्छता कर्मचा-यांना एनर्जी सप्लायर्स म्हणून आर्थिक उत्पन्नाचा एक पर्यायी स्त्रोत देखील याद्वारे उपलब्ध होऊ शकतो. यामुळे त्यांना आपले उत्पन्न किमान १० पटींनी वाढविणे शक्य आहे, असे प्रियदर्शन यांनी आवर्जून नमूद केले.

ओल्या कच-याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावत असताना घरांमध्ये, हॉटेल, कॉर्पोरेट कॅन्टीन यांबरोबरच सोसायटीमध्ये देखील वायु हे उपकरण बसविण्यात आले असून, जे नागरिक वायु वापरतात त्यांना आम्ही अभिमानाने वायुमित्र या नावाने संबोधतो, असेही प्रियदर्शन यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading